नागपूर - बँका म्हटले तर सर्वसामान्यांचे पैसे सुरक्षित ठेवण्याचे हक्काचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. मात्र बँकांमध्ये केवळ मोठे आर्थिक घोटाळे (Banking Scam) होते असे नाही. तर वर्षभराच्या कालावधीत अनेक छोटे छोटे घोटाळे होऊन जातात ज्याची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाही. पण नागपुरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर (RTI Activist Abhay Kolarkar) यांनी माहिती अधिकारात मिळवलेल्या माहितीमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ज्यामध्ये देशभरातील विविध बँकांमध्ये वर्षभरात जवळपास छोटे-मोठे असे 77 हजार घोटाळे झाले. ज्यामध्ये 60 हजार कोटीं रुपयांची अफरातफर झाली आहे. विशेष म्हणजे ही अफरातफर सर्व सामान्यांच्या पैशांसोबत झाली आहे.
नागपूरचे माहिती अधिकारी कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी मागील आर्थिक वर्षात म्हणजेच 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत बँकांमध्ये किती आर्थिक घोटाळे झाले याची अधिकृत माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मागितली होती. यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीमध्ये एक दोन नाही तर 60 हजार 530 कोटी रुपयांचे घोटाळे झाले अशी माहिती समोर आली. त्या घोटाळ्याची रक्कम 77 हजार 564 रुपये इतकी आहे. त्यामुळे देशभरातील बँकांच्या संख्येपुढे जरी आकडे छोटे दिसत असले तरी विचार केल्यास हा आकडा भरपूर मोठा आहे.
घोटाळ्यात सहभागी बँक कर्मचाऱ्यांवरही कारवाई - बँकांमध्ये होणाऱ्या घोटाळ्यात खोटया कागदपत्राद्वारे कर्जाची उचल करणे, त्याची परतफेड न करणे, चुकीची तारण देऊन, माहिती देऊन पैशांची उचल करणे यासह ऑनलाइन फ्रॉड, असे नाना प्रकार बँकिंग घोटाळा म्हणून संबोधले जाते. काही बँकेतील कर्मचाऱ्यांशी साठंगाठं ठेवून लिलावात काढणाऱ्या वस्तू कमी किमतीत घेणे असे अनेक प्रकार घडत असतात. यातच माहिती अधिकारात जी माहिती पुढे आली, त्यात वर्षभराच्या कालावधीत ज्या बँक कर्मचाऱ्यांचा काळात घोटाळे झाले आणि ते दोषी मिळून आलेत अश्या 2729 कर्मचाऱ्यांवर कारवाई झाल्याची माहिती सुद्धा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून देण्यात आली आहे.
काही बँक शाखेचे विलनिकरण तर काहींचे परवाने रद्द - मागील वर्षभराच्या कालावधीत कॅनरा बँकेच्या 882 शाखेचे विलनीकरण करण्यात आले. यासोबत इंडिया बँकेच्या 280 शाखा, पंजाब नॅशनल बँकेच्या 729 शाखा, तेलंगणा ग्रामीण बँकेच्या 467 शाखा, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेच्या 8 शाखा, यासोबत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 45 शाखेचे विविध कारणांनी 2636 विलनीकरण करण्यात आले. तर 29 बँक शाखा कायमस्वरूपी बंद करण्यात आलेल्या आहेत. यासोबतच 24 बँकांचे मागील पाच वर्षांच्या काळात परवाने रद्द करण्यात आले.
दररोज लाखो लोक जेव्हा बँकेत आपले पैसे जमा करण्यासाठी रांगा लावून उभे असतात, त्या वेळेत सरासरी 212 घोटाळे हे बँकांमध्ये घडत असतात. या सोबत सुरक्षित ठेवलेल्या पैश्यावर मागील काही काळात ऑनलाइन फ्रॉड करणारे, डल्ला मारणारेही वाढत चालले आहेत. नागरिकांच्या तक्रारीसुद्धा वाढल्या आहेत. यात बँकेकडून तक्रार करून न्याय न मिळाल्याने जवळपास 2 लाख 75 हजार ग्राहकांनी आपल्या तक्रारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे केल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे.
कायदे करून नाही तर कठोर कारवाई झाली तरच अटकाव होईल - बँकेत घोटाळे होणे हे काही नवीन नाहीच मागील काळात अनेक नियम आले, अनेक बड्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली, काहींच्या चौकशा सुरू आहेत. पण सर्व सामान्य जनतेचे पैसे सुरक्षित समजले जात असताना बँकेतील काही महाभाग बँकांच्या अर्थकारणाला पोखरत आहेत. यात उघडकीस आलेले घोटाळे 60 हजार कोटी रुपयांचे असतील तर असे अनेक घोटाळे आजही बँकिंग क्षेत्रात कागदांवर असतील याचा नेम नाही. त्यात नियमावली जरी कठीण असली तरी पळवाट काढताना दिसून येत आहे.