नागपूर - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नागपूर विभागात होऊ घातलेल्या धानपरिषद निवडणुकीत(Legislative Council elections 2021) काँग्रेसने भाजपचे बंडखोर नगरसेवक डॉ. रवींद्र (छोटू) भोयर (Congress Candidate Ravindra Bhoyar) यांना उमेदवारी दिली. त्यामुळे काँग्रेसमधील अनेक इच्छुक निष्ठावंत दुखावले गेले आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीसुद्धा आपली नाराजी उघडपणे स्पष्ट बोलून दाखवली. त्यामुळे आघाडीत बिघाडीचे चित्र निर्माण होऊ शकते. नाराजी दूर झाली नाही तर राष्ट्रवादीचे नेते निवडणुकीपासून दूर राहतील, असे शहराध्यक्ष दूनेश्वर पेठे यांनी जाहीर केले. त्यामुळे काँग्रेससाठी ही निवडणूक जड जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
विधानपरिषद निवडणूकीत काँग्रेस पक्षाने कुणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, उमेदवार जाहीर करण्यापूर्वी महाविकास आघाडीतील घटक पक्षांना याबाबत माहिती दिली असती तर आघाडी धर्माचे पालन झाले असते, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
- ...तर निवडणुकीच्या प्रचारापासून दूर राहू-
गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विविध प्रकारचे स्टेटमेंट देऊन राष्ट्रवादी काँग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी विदर्भात राष्ट्रवादीचे दुकान बंद करू असे वक्तव्य केले होते. त्याला शरद पवार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. स्थानिक पातळीवरसुद्धा काँग्रेसकडून राष्ट्रवादीला दुय्यम वागणूक देत आहेत, त्यामुळे पक्षश्रेष्ठींच्या आदेशाशिवाय या निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होणार नसल्याची भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली आहे.
- काँग्रेसकडून दोन अर्ज दाखल -
विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसने ऐनवेळी आयात केलेले रवींद्र भोयर यांना उमेदवारी देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. मात्र, अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसचे नगरसेवक प्रफुल्ल गुडघे यांनीसुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे काँग्रेसचा नेमका उमेदवार कोणता हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे.