नागपूर - कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असतांना सुपर स्प्रेडर शोधण्यासाठी महत्वाचे पाऊल महापालिका प्रशासनाने हाती घेतले होते. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी बाजारपेठा, बँक, शासकीय आणि खासगी कार्यालय, दुकाने इत्यादी ठिकाणी असणारे जे लोक 'सुपर स्प्रेडर' ठरू शकतात अशांची कोरोना चाचणी करण्यात आली. हा उपक्रम शहरातील दहाही झोनमध्ये राबविण्यात आला. यामध्ये जवळपास सहा हजारांपेक्षा अधिक जंणाची चाचणी करण्यात आली.
महापौर दयाशंकर तिवारी आणि महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याकडून आरोग्य विभागाला सुपर स्प्रेडर्सची चाचणी करण्याचे निर्देश दिले होते. यामध्ये 11 मोबाइल व्हॅन आणि 45 चाचणी केंद्रांचा उपयोग करण्यात आला. सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या पथका व्यतिरिक्त नव्याने आणखी 10 पथक चाचणीसाठी तयार करण्यात आल्या आहेत. नवीन पथकाच्या माध्यमातून बालकांची तसेच मधुमेह आजाराने त्रस्त नागरिकांची चाचणी करण्यात येणार आहे.
कळमना बाजारात घेतले चाचणी शिबीर
पालिकेच्या वतीने कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळी विशेष शिबीर आयोजित करून चाचणी करण्यात आली. तसेच विविध आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांचीही चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून दिली जात आहे.
नागरिकांनी लक्षणे दिसताच चाचणी करून घ्यावी
शहरातील दहाही झोनचे सहायक आयुक्त आणि झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चाचणीच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व व्यवस्था संबंधित झोनमध्ये केलेली आहे. ज्या नागरिकांना कोरोनासदृश लक्षणे आहेत किंवा जे कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आले आहेत, अशा व्यक्तींनी चाचणी करून कोरोनाची साखळी तोडण्यास सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
हेही वाचा - कामठी कॅन्टोनमेंट रुग्णालयातील कोविड केअर सेंटरची पालकमंत्र्यांनी केली पाहणी