नागपूर - विधानसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची लगबग सुरु आहे. यात वंचित बहुजन आघाडी 'आघाडीवर' असल्याचे दिसून येते. वंचित बहुजन आघाडीला विधानसभेसाठी योग्य उमेदवार मिळावा याकरता शनिवारपासून उमेदवारांच्या मुलाखती घेणे सुरु आहे.
नागपूर विभागातील नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातील मतदारसंघासाठी या मुलाखती होणार आहेत. यात जवळपास ६० पेक्षा जास्त इच्छुक उमेदवार मुलाखती देणार असल्याची माहिती आहे. वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या सर्वच 288 जागा लढवणार आहे. त्यामुळे वंचितच्याच कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली जाणार नसून इतरही काही इच्छुक उमेदवार असतील त्यांना देखील उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती भारिप बहुजन महासंघाचे पदाधिकारी अण्णाराव पाटील यांनी दिली.
विशेष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही उमेदवार वंचितच्या संपर्कात असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. काँग्रेस सोबत आघाडी होणार की नाही हे येणारी वेळ सांगेल. मात्र काँग्रेसवर अवलंबून न राहता वंचित आपले उमेदवार तयार ठरवतील व त्यानुसार विधानसभेची तयार करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.