नागपूर - राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Day 2021) नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमीवर (Dikshabhoomi) काही मोजक्याच अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळाले. ऐरवी आजच्या दिवशी संपूर्ण दीक्षाभूमी परिसर गर्दीने फुलून जातो. मात्र, राज्यात ओमायक्रोनचा धोका (Omicron In Maharashtra) वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर यावर्षी दीक्षाभूमी वर गर्दी करू नका, असे आवाहन प्रशासनाकडून आंबेडकरी जनतेला करण्यात आले होते. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत बहुतांश अनुयायांनी बाबासाहेबांना घरूनच अभिवादन केले. यावेळी राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत (Dr Nitin Raut), क्रीडामंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांच्यासह प्रशासनातील सर्वच अधिकारी अभिवादन करण्यात दीक्षाभूमीवर एकत्रित आले होते.
आज बाबासाहेबांचा 65 वा महापरिनिर्वाण दिन -
बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांसाठी मुंबई येथील चैत्यभूमी प्रमाणेच नागपुरातील दीक्षा भूमीचे महत्व फार मोठे आहे. बाबासाहेबांनी नागपूरच्या दीक्षा भूमीवरच बौद्ध धर्माची दीक्षा स्वीकार केली होती. आज बाबासाहेबांचा 65 वा महापरिनिर्वाण दिन असल्याने हजारो अनुयायी मुंबईला जातात. मात्र ज्या अनुयायांना मुंबईला जाणे शक्य होत नाही, ते हजारो बौद्ध अनुयायिनी दीक्षाभूमीवर जाऊन बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन करतात.
आंबेडकरी अनुयायांकडून जबाबदारीचे वहन -
गेल्या दोन वर्षांपूर्वी निर्माण झालेला कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. यावर्षी तर कोरोनाचा नवीन प्रकार ओमायक्रॉनने डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. ओमायक्रोनचा प्रसार अत्यंत वेगाने होत असल्यामुळे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि दीक्षाभूमीवर गर्दी न करता घरूनच बाबासाहेबांना अभिवादन करावे, आवाहन नागपूरच्या जिल्हा प्रशासनाने केले होते. त्याला प्रतिसाद देत नागरिकांनी जबाबदार नागरिकांप्रमाणे सूचनांचे पालन करत आपल्या सामाजिक जबाबदारीचे वहन निष्ठेने केले आहे.