नागपूर - विधानपरिषदेच्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण होताच भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दोन मंत्र्यांच्या दबावाला बळी पडून मतदानाच्या १२ तासांपूर्वी काँग्रेसला आपला उमेदवार बदलावा लागला. त्यामुळे पक्षाची नामुष्की झाली आहे. ते आपल्याच कार्यकर्त्यांना न्याय देण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे त्यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी बावनकुळे यांनी केली आहे. काँग्रेसच्या इतिहासात नाना पटोले यांच्यासारखे हतबल प्रदेशाध्यक्ष काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बघितले नसतील, असा टोलासुद्धा बावनकुळे यांनी नाना पाटोलेंना लावला आहे.
काँग्रेसच्या एका कृतीमुळे त्यांच्या पक्षात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होत असल्याची भावना तयार असल्याचे देखील बावनकुळे म्हणाले आहेत. एवढचं नाही तर त्यांनी ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणावरून महाविकास आघाडी सरकारच्या कामकाजावर जोरदार टीका केली आहे.
- इम्पेरिकल डेटा देण्यास मनमोहन सिंगांनी दिला होता नकार -
ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणावरून काँग्रेसचे काही पोपट केंद्राकडे असलेला इम्पेरिकल डेटा म्हणून मागत आहेत. मात्र, तो डेटा राजकीय आरक्षणाकरता वापरता येत नाही. खुद्द मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान असताना तो डेटा देण्यास नकार दिला होता, असा खुलासा बावनकुळे यांनी केला आहे. हे सरकार खोटं बोलून वेळकाढूपणा करत आहे. 9 महिन्यांपूर्वीच काम सुरू केले असते तर आज इम्पेरिकल डेटा तयार झाला असता, असे देखील ते म्हणाले आहेत.
- मागणी 465 कोटींची, दिले 5 कोटी -
ज्या ओबीसी जनतेचे मतं घेऊन हे आमदार आणि मंत्री झाले, त्याच ओबीसी जनतेच्या आरक्षणासाठी फक्त पाच कोटी रुपये देतात ही निर्लज्जतेची आणि शरमेची बाब आहे. महाविकास आघाडीच्या चुकीच्या धोरणामुळेच ओबीसी आरक्षण गेले आहे. 465 कोटी रुपयांची गरज असताना पाच कोटी रुपये देणे म्हणजे तोंडाला पाने पुसण्याचे प्रकार असल्याचे ते म्हणाले आहेत.