नागपूर - केंद्रीय भविष्य निर्वाह निधी (इपीएफओ)च्या नागपूर येथील दोन कार्यालयांमध्ये प्रचंड अनियमितता असल्याच्या अनेक तक्रारी वरून केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय)च्या पथकाने धाड टाकून झाडाझडती घेतली आहे. सीबीआयच्या नागपूर पथकाने ही कारवाई केली आहे. ईपीएफओ कार्यालयातील काही कर्मचारी खाजगी कंपन्यांना फायदा पोहोचवण्याचे काम करत आहे,अशी तक्रार मिळाल्यानंतर सीबीआयच्या नागपुरातील पथकाने ईपीएफओ कार्यालय गाठले, आणि त्या ठिकाणी अनेक तास कागदपत्रांची तपासणी केली असल्याची माहिती पुढे आली आहे.
कागदपत्रांची तपासणी - केंद्रीय भविष्य निर्वाह निधी म्हणजेच इपीएफओच्या नागपुरातील विभागीय व उपविभागीय कार्यालयात काल संध्याकाळी सीबीआयच्या पथकाने चौकशी केली आहे. ईपीएफओ कार्यालयातील काही कर्मचारी खाजगी कंपन्यांना फायदा पोहोचवण्याचा काम करत आहे अशी तक्रार मिळाल्यानंतर सीबीआयच्या नागपुरातील पथकाला प्राप्त झाली होती, त्याआधारे सीबीआयच्या दोन पथकांनी ईपीएफओ कार्यालय गाठले आणि त्या ठिकाणी अनेक तास कागदपत्रांची तपासणी केली आहे.
खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केली तक्रार - ईपीएफओचे काही कर्मचारी जाणून-बुजून काही खाजगी कंपन्यांमध्ये जास्त कर्मचारी असतानाही त्या कंपन्यांच्या दाव्याप्रमाणे कमी कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी जमा करून घेत आहेत. खाजगी कंपन्यांना फायदा पोहोचवण्यासाठीच ईपीएफओचे कर्मचारी असे नियमबाह्य कार्य करत असल्याची तक्रार त्या खाजगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनी केली होती. त्यानंतर सीबीआयने ही चौकशी हाती घेतली आहे. दरम्यान या चौकशीनंतर सीबीआयने काही कागदपत्रे सोबत नेले आहेत. याप्रकरणी ईपीएफओच्या काही कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.