नागपूर - राज्यपाल राज्याचे घटनात्मक प्रमुख असल्याने विधानसभा अध्यक्षांची निवड कधी करणार हा प्रश्न राज्यसरकारला विचारण्याचा अधिकार राज्यपालांना असल्याचे मत भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे. विधानसभा अध्यक्ष निवड लवकर झाली तर अर्थसंकल्पीय अधिवेशन चालवणे सोयीचे होईल, असेही ते म्हणाले आहेत.
'विधानसभा अधिवेशन घ्यायचे आहे'
नाना पटोले यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागल्यामुळे त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्ष निवडीच्या संदर्भात कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. आगामी काळात राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात सरकारला विचारले आहे. या संदर्भात विचारले असता भारतीय जनता पार्टीचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यपालांची पाठराखण केली आहे. ते म्हणाले, की राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख म्हणून विधानसभा अध्यक्ष निवडीच्या संदर्भात विचारणा करण्याची त्यांची जबाबदारी आहे. विधानसभा अधिवेशन घ्यायचे आहे, त्यामुळे अध्यक्षांच्या नियुक्तीचा प्रश्न पुढे येणे स्वाभाविक आहे.
'काँग्रेसच्या काळात आमदारांची नियुक्ती दोन वर्षे रखडली होती'
राज्यपालांनी १२ आमदारांची निवडप्रक्रिया रखडवली असताना महाविकास आघाडीकडून आरोपी-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यावर त्यांनी भाष्य केले आहे. या आधी जेव्हा राज्यात काँग्रेसची सत्ता होती, त्यावेळी सुद्धा २ वर्षे विधान परिषदेच्या आमदारांची निवड करण्यात आली नव्हती. त्यावेळी काँग्रेस काही बोलत नव्हती. मग आताच विरोध का, असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला आहे. आमदारांची निवड करणे हा राज्यपालांच्या अखत्यारीतीला प्रश्न आहे. यावर ते निर्णय घेतील.
'अजब सरकार की गजब कहाणी'
महाविकास आघाडीमधील मंत्री संजय राठोड कुठे गायब आहेत, यावर विचारले असता अजब सरकार की गजब कहाणी म्हणत टीका केली आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री कुठे आहेत, यासंदर्भात कुणालाही थांगपत्ता लागत नसला तरी त्यांचा पत्ता एकतर पोलीस सांगू शकतील, ते स्वतः सांगू शकतील, किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगू शकतील असं म्हणत त्यांनी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.