नागपूर - भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर कलम १८८ अन्वये नागपूर शहरातील कोराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ( Case Registered Against Bawankule ) झाला आहे. पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करताना कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नाना पटोले विरोधात केले होते आंदोलन -
भंडारा येथे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. नाना पटोले विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी दोन दिवसांपूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली भाजप नेते आणि कार्यकर्ते शहरातील कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी गेले होते. त्यावेळी बावनकुळे यांनी गुन्हा दाखल केल्याशिवाय जाणार नाही असा पवित्रा घेत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलना दरम्यान भाजप कार्यकर्त्यांसह नेत्यांची गर्दी गोळा झाल्याने कोरोना नियमांचे उल्लंघन झाले होते, त्यामुळे नागपूर पोलिसांनी बावनकुळे विरुद्ध कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
...तर भाजपा नेते जाणार न्यायालयात -
तीन दिवसात नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा न्यायालयात जाऊन दाद मागू अशी भूमिका बावनकुळे यांनी घेतली होती. आज बावनकुळे यांनी दिलेली तीन दिवसांची डेडलाईन संपली आहे. मात्र, पोलिसांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. त्यामुळे आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी कारवाई करण्यासाठी पोलिसांना सात दिवसांची डेडलाईन वाढवून दिली आहे. आठव्या दिवशी भाजप नेते कलम 156 (3) अन्वये गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात जाईल असे ते म्हणाले आहेत.
हेही वाचा - Nana Patole On Nagar Panchayat Election : "...म्हणून स्वबळावर लढण्याचा निर्णय"