नागपूर - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी यांच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर ( Nana Patole Controversial Statement ) भारतीय जनता पक्ष विरुद्ध नाना पटोले असा जोरदार संघर्ष पेटलेला आहे. कुठल्याही परिस्थितीत नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा याकरिता भाजप नेते गेल्या दोन दिवसांपासून प्रयत्नरत आहेत. मात्र तरीही अद्यापही पोलिसांनी नाना पटोलेंवर गुन्हा दाखल केलेला नाही. त्यामुळे भाजप नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. नानांच्या रूपाने परमेश्वराने केवळ एक जीव खोटं बोलण्यासाठी या भूतलावर पाठवला असल्याचं वक्तव्य भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं ( Chandrashekhar Bawankule Criticized Nana Patole ) आहे.
खोटं बोलून पदं मिळवली
भारतीय जनता पक्षातून काँग्रेसमध्ये जाताना देखील नानांनी खोटं बोलूनच आपला प्रवेश निश्चित केला असावा, असा टोला देखील बावनकुळे यांनी लगावला आहे. काँग्रेसमध्ये इतके अनुभवी नेते असताना सुद्धा नाना पटोले यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी खोटं बोलूनच प्रदेशाध्यक्षपद मिळवले असल्याचा आरोप केला आहे.
तीन दिवस झाले आता सात दिवसांची डेडलाईन
तीन दिवसात नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा न्यायालयात जाऊन दाद मागू अशी भूमिका बावनकुळे यांनी घेतली होती. आज बावनकुळे यांनी दिलेली तीन दिवसांची डेडलाईन संपली आहे. मात्र, पोलिसांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. त्यामुळे आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी कारवाई करण्यासाठी पोलिसांना सात दिवसांची डेडलाईन वाढवून दिली आहे. आठव्या दिवशी भाजप नेते कलम 156 (3) अन्वये गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात जाईल असे ते म्हणाले आहेत.