नागपूर - केंद्रात भाजप सत्तेत येऊन सुमारे सहा महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत अजून कोणतीही चौकशी सुरू झाली नसल्याने सरकारने याबाबत खुलासा करावा, अशी मागणी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी केली. नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
लोकसभा निवडणुकीपूर्वी पुलवामा येथे झालेल्या स्फोटात केंद्रीय राज्य राखीव दलाचे जवान शहीद झाले होते. जवानांचा ताफा जात असणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात स्फोटके कशी आली,कोणी आणली, याची चौकशी आतापर्यंत का झाली नाही असा प्रश्न बघेल यांनी यावेळी उपस्थित केला.
तसेच देशात मोठ्या प्रमाणात आर्थिक मंदीचे सावट असताना छत्तीसगडमध्ये आर्थिक मंदी नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांमुळे छत्तीसगडमध्ये आर्थिक मंदीचे सावट नसल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.