नागपूर - नागपूर शहरातील अजनी पोलीस ठाण्यात एका १६ वर्षीय तरुणीने तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार दिल्याने खळबळ माजली आहे. तक्रार दाखल होताच अजनी पोलिसांनी या गुन्ह्यातील चार आरोपींना अटक केली आहे. मात्र एकाच आरोपीने बलात्कार केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. इतर तीन आरोपींनी या घृणास्पद कृत्यात नराधमाला सहकार्य केल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. पोलिसांनी मेडिकल रुग्णालयात तक्रारदार तरुणीची वैद्यकीय चाचणी करवून घेतली आहे. त्याचा अवहाल आल्यानंतर पुढील कारवाई करणार असल्याची माहिती सहायक पोलीस उपायुक्त निलेश पालवे यांनी दिली आहे.
शस्त्रांचा धाक दाखवून बलात्कार-
सहायक पोलीस उपायुक्त निलेश पालवे यांनी दिलेल्या माहितीनुसार काल संध्याकाळच्या सुमारास फिर्यादी तरुणी तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी गेली होती. त्यावेळी चौघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला, अशी तक्रार रात्री उशिरा पीडित तरुणीने अजनी पोलीस ठाण्यात येऊन दाखल केली. लोखंडे टोळीतील अमित, प्रशिक दत्तूसह आणखी एका आरोपीने शस्त्रांचा धाक दाखवून बलात्कार केल्याचं त्या तरुणीचं म्हणणं होतं. त्या आधारे प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अजनी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी चार आरोपींना अटक केली. मात्र तक्रादार तरुणी वारंवार जबाब बदलवत असल्यामुळे गुन्हा दाखल करताना पोलिसांच्या समोर पेच निर्माण झाला होता. सध्या पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर तपासाला सुरवात केली आहे.
वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा
पीडित मुलीने तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानंतर पीडित मुलीने अनेक वेळा आपला बयान बदलल्यामुळे पोलिसांना तिच्या वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे,त्यानंतर पुढील गुन्हे दाखल केले जाणार असल्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे.
हेही वाचा- फोन टॅपिंग प्रकरण: अनेक मंत्र्यांचेही फोन टॅप; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप