नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख आता फसले आहेत. त्यांना आणि कुटुंबीयांना ओळखत असल्याने कुणाला तरी वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःचा बळी देऊ नये. जे पैसे होते ते कुणाला दिले याचा खुलासा करून न्यायालयात माफीचा साक्षीदार व्हावे असे वंचित बहुजन आघडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ते रवी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी फटाके फुटायला सुरवात झाली पण मेन फटाका केव्हा फुटतो हे महत्वाचे असल्याचेही ते म्हणालेत.
यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, माजी गृहमंत्री अडकलेल्या प्रकरणात पैसे देण्यात आले. पैसे घेण्यात आल्याचे व्यवहार चौकशीत दिसून येत आहे. पण अनिल देशमुख यांच्याकडे ते पैसे नाही. तर मग त्यांनी हे पैसे कुणाला तरी दिले आहेत. त्यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ते पैसे कुणाला दिले आहे? त्यांची नावे सांगावी असे आंबेडकर म्हणाले.
राज्यपालांनी पावले उचलावी
या प्रकरणात कुणाचा तरी बळी दिला जात आहे हे समोर येत आहे. मात्र राजा कोण आहे हे अजून स्पष्ट होत नाही. यात तपास करणाऱ्या संस्था असो की पोलीस, हे मात्र वजीर कोण आहे आणि राजा कोण आहे यांना समोर आणत नाही. त्यामुळे या गंभीर परिस्थितीत राज्यपालांनी योग्य विचार करावा. कारण त्यांना खुपिया विभागाकडून या सगळ्या बाबींचा अहवाल जात असतो. त्यामुळे त्यांनी यावर पावले उचलावी अशी त्यांना विनंती असल्याचेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
मुख्यमंत्री असताना कारवाई का केली नाही?
देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिकांच्या कुटुंबातील लोकांनी दाऊदच्या माणसांकडून महागाची संपत्ती कवडीमोल भावात विकत घेतल्याचा आरोप केला आहे. त्यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, त्यांनी हे प्रकरण आता का उचलले? तर भाजपवर नावब मलिक यांच्याकडून होत असलेल्या आरोपांमुळे लक्ष विचलित करण्यासाठी हे प्रकरण भाजपने उचलले आहे. यात नवीन काहीच नसून देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असतानासुद्धा त्यांना या सगळ्या बाबींची माहिती होती. त्यावेळेस त्यांनी का कारवाई केली नाही असाही प्रतिप्रश्नही आंबेडकर यांनी केला आहे.
राजकारण कमर्शियल झाले
संपूर्ण राज्य सध्या माफियांच्या हातात गेले आहे. सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रवादी आणि भाजपचे भांडण लागल्याचे दिसून येत आहे. पण महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने हे भांडण चांगले नाही. कारण या पक्षातील काही राजकीय नेत्यांचे चारित्र्य समोर येत आहे. एकेकाळी सेवा म्हणून असलेले राजकारण आता मात्र कमर्शियल झाले आहे. या परिस्थिती कोर्टाची भूमिका मात्र महत्वाची असणार आहे. यात सुप्रीम कोर्टाने आणि उच्च न्यायालयाने राजकीय मंडळींवर असलेली आर्थिक आणि भष्ट्राचाराचे प्रलंबित गुन्हे प्रकरण निकाली काढवेत. जेणेकरून राजकारणात घुसलेले कमर्शियलायझेशन असो की क्रिमिनलायझेशन असो ते बाहेर पडण्यासाठी कोर्टाची मदत होणार आहे यासाठी कोर्टाला विनंती असल्याचे ते म्हणालेत.