नागपूर - सिने जगतातील मोठे नाव म्हणजे शनशाह अमिताभ बच्चन. पण हे शहनशा असो की मग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे स्वतः किचनमधील कचऱ्यापासून खत तयार करून, किचन गार्डनिंग करून भाजीपाला उगवत आहेत असे म्हटले तर विश्वास बसणार नाही. पण याचा खुलासा खुद्द नितीन गडकरी यांनीच केला आहे. ते आज नागपूरच्या हिंगणा परिसरात असलेल्या सीआरपीएफ कॅम्पमध्ये बोलत होते.
सीआरपीएफ कॅम्पमध्ये नव्याने प्रशिक्षणासाठी दाखल झालेल्या 418 जवानांसोबत संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थित जवानांना आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी योगा करण्याचा सल्ला दिला. यावेळी त्यांनी अमिताभ बच्चन यांनी किचन गार्डनमध्ये भाजीपाला उगवण्यास कशी सुरुवात केली, याचा किस्सा देखील सांगितला. ते म्हणाले की दोन वर्षांपूर्वी एका कार्यक्रमादरम्यान अमिताभ आणि मी बोलत होतो. त्यावेळी मी त्यांना किचन गार्डनिंग करून भाजीपाल्याचे उत्पादन घेत असल्याचे सांगितले, तेव्हापासून त्यांनी देखील किचन गार्डनिंगला सुरुवात केली.
'सीआपीएफलाही मिळणार टोलमध्ये सूट'
यावेळी नागपूर ग्रुप सी केंद्राचे डीआयजी प्रशांत जामभोळकर यांनी केंद्रीय मंत्री गडकरींना 'सीआरपीएफ'ला टोलमधून सूट नसल्याची बाब लक्षात आणून दिली. यावर मिलिटरी पोलीस याना सूट असतांना सिआरपीएफचे नाव कोण्यातरी सचिवांच्या चुकीने राहून गेले. सरकार असेच चालते, देवाच्या मंदिराप्रमाणे सचिवांना नंदिसारखे महत्त्व असते. नाव का सुटले हे पाहावे लागेल, पण हा विषय माझ्याच खात्याचा असल्याने यातून सूट देण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेऊ, असं देखील ते यावेळी म्हणाले.
हेही वाचा - काँग्रेसला महाराष्ट्रात एक क्रमांकाचा पक्ष बनवणार; 'संकल्पदिनी' काँग्रेस नेत्यांचा निर्धार