नागपूर - अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने कोरोनामुळे बंद असलेले महाविद्यालय सुरू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. नागपूर महापालिका क्षेत्रातील 5 महाविद्यालयांसमोर अभाविपच्यावतीने आंदोलन करण्यात आले.
कोरोनामुळे मागील ११ महिन्यांपासून राज्यातील सर्व महाविद्यालये बंद आहेत. लॉकडाऊन काळात बंद असलेल्या शाळा, मॉल, दारूची दुकाने, आणि इतर अनेक गोष्टी सुरू करायला सरकारने परवानगी दिली. मग महाविद्यालये अद्याप बंद का ठेवण्यात आली आहेत, असा सवाल उपस्थित करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने शहरातील विविध महाविद्यालयांसमोर आज आंदोलन करण्यात आले.
महाविद्यालय बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान
महाविद्यालय बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. ऑनलाईन पद्धतीचा उपयोग करत अभ्यासक्रम घेतला जातो, मात्र त्यात अनेक त्रुटी असल्यामुळे विद्यार्थ्यांना विषय निट समजत नाही. ग्रामीण भागात इंटरनेटची अडचण आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण करता येत नाही. या सर्व अडचणी लक्षात घेऊन सरकारने लवकरात लवकर महाविद्यालये सुरू करावीत अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.