नागपूर- राज्यात गेल्या काही महिन्यांपासून गाजत असलेल्या बनावट क्रीडा प्रमाणपत्र घोटाळ्यातील प्रत्येक दोषींवर कारवाई करणार असल्याची ग्वाही राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे. दोषी व्यक्ती कोणीही असेल तरी त्याची गय केली जाणार नाही. असे केदार यांनी म्हटले आहे.
बनावट क्रीडा प्रमाणपत्राच्या जोरावर राज्यातील अनेक शहरांमध्ये महत्त्वाच्या पदांवरील नोकऱ्या लाटण्याचे काम काही धनदांडग्यांनी केलेले आहे. या प्रकरणाला नागपूरमधील माणकापूर पोलिसांनी समोर आणले असून, आतापर्यंत राज्यातील विविध भागातून सुमारे पंधरापेक्षा अधिक अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. हे रॅकेट फार मोठं असून, भविष्यात आणखी काही जणांना यामध्ये अटक होण्याची शक्यता आहे. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री सुनील केदार यांनी म्हटले आहे की, राज्यात गेल्या काही महिन्यांपासून गाजत असलेल्या बनावट क्रीडा प्रमाणपत्र घोटाळ्यातील प्रत्येक दोषींवर कारवाई करण्यात येईल. यामुळे काही विद्यार्थ्यांवर अन्याय झाला, मात्र यापुढे असा अन्याय सहन केला जाणार नाही. प्रत्येक दोषींवर कारवाई करू असे अश्वासन यावेळी केदार यांनी दिले.
नागपूर पोलिसांनी उघड केला घोटाळा
नागपूर शहरातील माणकापूर पोलिसांनी बनावट क्रीडा प्रमाणपत्राच्या जोरावर नोकऱ्या लाटणाऱ्या या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी आतापर्यंत या घोटाळ्यात 15 पेक्षा अधिक अधिकाऱ्यांना अटक केली आहे. येत्या काळात हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.