नागपूर - नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तांडापेठ परिसरात २३ वर्षीय तरुणीचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पिंकी वर्मा असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. या संदर्भात पाचपावली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.
पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी दिलेल्या माहितीनुसार पिंकी वर्मा काही कामानिमित्त घराबाहेर पडली असताना काही अज्ञात आरोपींनी पिंकीवर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात पिंकीचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच पाचपावली पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी पिंकीचा मृतदेह मेयो रुग्णालयात उत्तरीय तपासणी करिता रवाना केला. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी आपली पथके कामाला लावली आहेत.
वैमनस्यातून पिंकीचा खून झाल्याचा संशय -
पिंकी वर्मा ही सामाजिक कार्यात पुढे राहायची. शिवाय राजकीय पक्षाच्या कार्यक्रम देखील तिचा वावर होता. पिंकीचा खून कुणी आणि कोणत्या कारणाने केला याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. प्राथमिक तपासात पिंकीच्या खुनामागे पूर्वीचे वैमनस्य असल्याचा अंदाज पोलिसांना असुन त्या दिशेने तपास केला जात आहे.