नागपूर - जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाने एकदिवसीय उच्चांक गाठला आहे. रविवारी नागपुरात एकाच दिवसात तब्बल २२५ रुग्ण आढळले आहेत. दोन दिवसांपूर्वीच २२२ रुग्ण आढळले होते. त्यानंतर पुन्हा २२५ रुग्णांची भर पडल्याने नागपुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४ हजार ६२ इतकी झाली आहे.
रविवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेले सर्व रुग्ण संशयित असल्याने प्रशासनाने त्यांना अगोदरच संस्थात्मक क्वारंटाईन केले होते. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली, ज्यात त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर या सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा - राज्यात ९ हजार ४३१ नव्या कोरोनाग्रस्तांची नोेंद; २६७ मृत्यू, तर ६ हजार रुग्णांना डिस्चार्ज..
नागपूरमध्ये रविवारी दिवसभरात ६७ कोरोना रुग्ण उपचारानंतर अगदी ठणठणीत बरे होऊन घरी देखील परतले आहेत. त्यामुळे नागपुरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ हजार ४६९ इतकी झाली आहे. या शिवाय आज पुन्हा सहा रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत नागपूरात एकूण ८२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्वाचे म्हणजे ८२ पैकी ६८ मृत्यू हे नागपुर जिल्ह्यातील आहेत, तर २० मृत्यू हे नागपूर जिल्ह्याबाहेरील आहेत. यामध्ये अमरावती आणि अकोला येथील कोरोनामुळे नागपुरात मृत्यू झालेल्या रुग्णांचा समावेश आहे.
सध्या नागपुरातील ७ ठिकाणी १ हजार ५२१ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात(मेयो) २९१ तर शासकीय वैद्यकीय रुग्णांलयात (मेडीकल) ४१६, एम्स मध्ये ५३,कामठी येथील मिलीटरी हॉस्पिटलमध्ये १० आणि खासगी रुग्णालयात ३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर मध्यवर्ती कारागृहात तयार करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये ६१ आणि आमदार निवास मध्ये ३६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नागपूरात रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ६०.५३ टक्के इतके आहे, तर मृत्यू दर हा २.०१ इतका आहे.