नागपुर - जिल्ह्यात मागील २४ तासात 15 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 295 झाली आहे. तसेच जिल्ह्यात एकूण 81 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात देखील केली आहे.
जिल्ह्यात एकूण 206 रुग्णांवर इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) व रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय रुग्णालय (मेडिकल) येथे उपचार सुरू आहेत. आज (रविवार) नव्याने कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या सर्वांना प्रशासनाने याआधीच क्वारंटाई केल्याची माहिती आहे.
हेही वाचा... मिशन वंदे भारत : लंडनमध्ये अडकलेले 329 भारतीय मायदेशी परतले
आजच्या ताज्या आकडेवारीनंतर राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा तीनशेच्या उंबरठ्यावर पोहचला आहे. मागील 24 तासात नव्याने पुढे आलेल्या सर्व रुग्णांचे सतरंजीपुरा आणि मोमीनपुरा असे कनेक्शन आहे. नागपुरातील सर्वात मोठे कोरोना हॉटस्पॉट असलेल्या मोमीनपुरा या भागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 150 इतकी झाली आहे. तर सतरंजीपुरा येथील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 109 इतकी झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने या दोन्ही हॉटस्पॉटमधील अडीच हजार नागरिकांना संस्थात्मक क्वारंटाईन केले आहे.