नागपूर - कोरोना विषाणूच्या प्रसारामध्ये नागपुरात हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरा परिसरातील नागरिक अद्यापही माहिती लपवत आहेत. त्यामुळे तेथील बहुतांश लोकांना विलगीकरण कक्षात पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सोमवारी रात्री उशिरा ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सुमारे १ हजार २०० नागरिकांची विलगीकरण कक्षात रवानगी करण्यात आली आहे. महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केली जात आहे.
सतरंजीपुरा परिसर नागपूरसाठी कोरोनाच्या दृष्टीने हॉटस्पॉट ठरला आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेचा चमू दररोज या परिसरात सर्व्हेक्षण करत आहे. नागरिकांना त्यांची इत्यंभूत माहिती विचारत आहेत. परंतु, अद्यापही नागरिक संपूर्ण माहिती देत नसल्याची बाब सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून लक्षात आली.
कोरोनामुळे मृत नागरिकांच्या संपर्कातील सुमारे २०० वर नागरिकांनीही अशीच माहिती लपवली होती. त्यांना वेळीच विलगीकरण कक्षात पाठवल्याने मोठा संसर्ग टळला. त्यातीलच पॉझिटिव्ह असलेल्यांचा आकडा ८० पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी खरी माहिती लपवली तर तेथून अनेक नागरिक पॉझिटिव्ह निघू शकतात, ही शक्यता नाकारता येत नाही. आताच उपाययोजना केल्या नाही तर संसर्गाचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही. म्हणूनच तेथील नागरिकांना तातडीने विलगीकरण कक्षात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.