मुंबई : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ( Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar ) यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील चैत्यभूमी येथे महाराष्ट्रभरातून आंबेडकर अनुयायी दर्शनासाठी गर्दी करत असतात. या अनुयायांसाठी भव्य असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे यथोचित स्मारक करण्याचा निर्णय सरकारने ( Indu Mill Memorial Mumbai ) घेतला. चैत्यभूमीला लागून असलेल्या बारा एकर जमिनीवर हा स्मारकाचा प्रकल्प उभा करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यासाठी केंद्र सरकारकडून जमीनही मिळवून घेतली. मात्र, गेल्या सहा वर्षांमध्ये या प्रकल्पाच्या कामाची म्हणावी तशी प्रगती झालेली ( Ambedkar Monument Work Is Slow ) नाही.
काय आहे कामाची स्थिती? : जानेवारी २०१६ मध्ये या कामाचे कंत्राट शापूर्जी पालनजी कंपनीला देण्यात आले. सध्या या प्रकल्पाच्या एकूण कामापैकी ३५ टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती प्रकल्पाचे मुख्य अभियंता रमेश साळुंखे यांनी दिली. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ४०० फूट उंचीचा पुतळा उभारण्यात येणार असून, त्यापैकी १०० फूट चौथऱ्याचे काम पूर्ण झाले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य कांस्य पुतळा प्रख्यात मूर्तिकार पद्मभूषण राम सुतार यांच्या हस्ते साकारला जात आहे.
कसे असेल स्मारक? : या स्मारकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रमधील ग्रंथालयात त्यांच्याबद्दलची माहिती, पुस्तके, लेख, जीवन चरित्र, माहितीपटाद्वारे केलेल्या सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय योगदानावर संशोधन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. चारशे लोकांची आसन क्षमता असलेल्या व्याख्यान वर्गांमध्ये कार्यशाळा घेण्याचीही सुविधा असणार आहे. तर एक हजार लोकांची आसन क्षमता असलेल्या अत्याधुनिक प्रेक्षागृहामध्ये सांस्कृतिक आणि सार्वजनिक कार्यक्रम घेता येणार आहेत. विपश्यना वर्गासाठी येणाऱ्या लोकांना ध्यानसाधना केंद्राचा उपयोग करता येणार आहे. या ठिकाणी असलेल्या विद्यमान तळ्याची सुधारणा आणि सुशोभीकरण करून महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याची प्रतिकृती करण्यात येत आहे. स्मारकासाठी एकूण सातशे नऊ कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.
सरकारी इच्छाशक्ती कमी पडते? : चैत्यभूमी लगत होणाऱ्या या इंदु मिलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. समुद्राच्या खाऱ्या पाण्यामुळे यात अडथळा येत असल्याचे प्रशासन सांगत असले तरी, खरा अडथळा राजकीय इच्छाशक्तीचा असल्याची भावना आंबेडकरी अनुयायी मोहन सपकाळ यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा : इंदू मिलमधील डॉ. आंबडेकरांच्या पुतळ्याची उंची आता 100 फुटांनी वाढली