मुंबई - काळबादेवी परिसरात 3 कोटी 8 लाख 10 हजार रुपये किमतीचे 1 किलो 27 ग्राम हेरॉईन हे अमली पदार्थ जप्त केले आहे. यात एका महिला अमली पदार्थ तस्कराला अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या वरळी युनिटने ही कारवाई केली आहे.
हेही वाचा - बेळगावात विवाहित तरुणीची प्रियकरासोबत गळफास घेऊन आत्महत्या
- अमली पदार्थ विरोधी पथकाच्या वरळी युनिटची कारवाई -
लॉकडाऊन दरम्यान मुंबई शहरात अमली पदार्थांची विक्री करणारे, पुरवठा करणारे व त्याचा साठा करुन विकणाऱ्यांच्या विरोधात मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, मुंबईतील काळबादेवी येथील प्रिन्सेस स्ट्रीट या ठिकाणी एक महिला हेरॉईन अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाच्या वरळी युनिटला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी 3 मे रोजी सदरच्या ठिकाणी सापळा रचला होता.
- महिला तस्कराला अटक
ज्या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचला होता, त्या ठिकाणी सदरची महिला अमली पदार्थ तस्कर आली असता तिला ताब्यात घेऊन पोलिसांनी तिची चौकशी केली. तेव्हा आरोपीच्या ताब्यातून 1 किलो 27 ग्रॅम वजनाचे हेरॉईन हे पदार्थ मिळाले असून, याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 3 कोटी 8 लाख 10 हजार एवढी असल्याचे समोर आले आहे. अटक करण्यात आलेली महिला ही दक्षिण व मध्य मुंबईत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची विक्री करणारी तस्कर असल्याचं समोर आले आहे. न्यायालयात या महिला आरोपीला हजर केले असता, तिची रवानगी 8 जूनपर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.
- काय आहे हेरॉईन
हेरॉईन हे अमली पदार्थ खसखसच्या रोपांवर प्रक्रिया करून बनवले जाते. प्रक्रिया केल्यानंतर हेरॉईन हा अमली पदार्थ पांढरा किंवा तपकिरी रंगाच्या पावडरमध्ये रुपांतरित केला जातो. अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या व्यक्ती सदरच्या या पदार्थाचं सेवन नाकाने ओढून किंवा धूम्रपानाने करतात.
हेही वाचा - छत्रपती घराण्याचे काम पेटवणे नाही; आम्ही योग्य वेळी ताकद दाखवू - खासदार संभाजीराजे