मुंबई - महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या बारा सदस्यांसाठी सुमारे दीड वर्षांपूर्वी यादी राज्यपालांकडे सुपूर्द केली होती. मात्र, या यादीतील सदस्यांच्या नियुक्ती संदर्भात राज्यपालांनी कोणतीही कारवाई केली नाही. List of MLAs appointed by the Governor महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी अनेकदा राज्यपालांना भेटूनही राज्यपालांनी या संदर्भात कोणतीही पावले उचलली नाहीत.
सत्तांतरानंतर नियुक्तीची होती शक्यता राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. भाजपाचे सरकार पुन्हा एकदा राज्यात स्थापन झाल्यानंतर विधान परिषदेतील भाजप आणि शिंदे गटाची ताकद वाढवण्यासाठी या 12 सदस्यांची नियुक्ती केली जाईल अशी दाट शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात होती. या बारा सदस्यांमध्ये कोणत्या नावांचा समावेश होतो याबाबत बरीच चर्चाही झाली. भाजप आणि शिंदे गटाच्या अनेक नेत्यांनी आपली वर्णी लागावी यासाठी जोरदार लॉबिंगही केले. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी 12 सदस्यांची नियुक्ती होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली नाही.
का झाली नाही सदस्यांची नियुक्ती राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाची यादी तयार आहे. मात्र, सत्ता बदल होताच राज्यपालांनी 12 सदस्यांची नियुक्ती केल्यास त्यावर जोरदार टीका होईल. इतकेच नाही तर राज्यातील जनतेमध्येही सरकार आणि भाजप विरोधी संदेश जाईल. त्यामुळे तातडीने बारा सदस्यांची नियुक्ती करणे योग्य नाही असे मत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी वर्तवले आहे. त्यामुळेच 12 सदस्यांची नियुक्ती रखडली आहे.
केव्हा होणार नियुक्ती राज्यपाल भगतसिंह कोष्यारी यांनी 12 सदस्यांच्या निवडीला लगाम घातला आहे त्यांनीच निवड करणे सद्य परिस्थितीत योग्य नाही, त्यामुळे राज्यात राज्यपाल बदल झाल्यानंतर नव्या राज्यपालांची नियुक्ती झाल्यानंतर सर्वात प्रथम 12 सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्याने दिली. आगामी यादीत या नेत्याचाही समावेश असल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. तसेच, अधिवेशनानंतर तीन आठवड्यात ही कार्यवाही होईल अशी शक्यता त्यांनी वर्तवल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या जागी लवकरच नव्या राज्यपालांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे त्यांनी वर्तवली आहे.
हेही वाचा - Sahitya Akademi संगीता बर्वे यांच्या पियूची वही या पुस्तकास साहित्य अकादमी पुरस्कार