मुंबई - अमेझॉन या सर्वात मोठ्या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर मराठी भाषा नसल्याने मनसे आक्रमक झाली होती. अमेझॉनने आपल्या वेबसाईटमध्ये मराठी भाषेचा समावेश करावा अशी मागणी मनसेने केली होती. आता मनसेने आपला मोर्चा पश्चिम रेल्वेकडे वळवला आहे. पश्चिम रेल्वेच्या वतीने प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती, पत्रके हे मराठीत असावेत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
मनसेकडून आंदोलनाचा इशारा
पश्चिम रेल्वेकडून विविध माहिती पत्रके, जाहिराती प्रसिद्ध होत असतात. तसेच सोशल मिडियाच्या माध्यमातूनही माहिती प्रसारित करण्यात येते. परंतु या सर्व जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर केला जात नाही. केंद्र शासनाच्या त्रिभाषा सूत्रानुसार राज्याची भाषाही वापरणे बंधनकारक आहे. परंतु पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. पश्चिम रेल्वे मुंबई विभागाचा बहुतांश भाग हा मुंबईमध्ये येत असून, स्थानिक मराठी भाषेचा वापर केला जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे रेल्वे विभागाने याची गंभीर दखल घेऊन, तातडीने रेल्वेकडून प्रसिद्ध होणाऱ्या पत्रकांमध्ये, जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा समावेश करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा जितेंद्र पाटील यांच्यावतीने देण्यात आला आहे.