मुंबई - जून महिन्यात राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मात्र, त्यानंतर काही दिवस पावसाने दडी मारली आहे. जून महिन्याच्या सुरूवातीलाच चांगली बॅटिंग करणारा पाऊस येत्या 15 जुलैपर्यंत राज्यात विश्रांती घेण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे पुढील 10 दिवस पावसाच्या सरी बरसणार नाहीत. मान्सूनला पोषक स्थिती नसल्यामुळे 10 जुलैपर्यंत पावसाची परिस्थिती साधारण अशीच राहील. त्यानंतर 15 जुलैपासून राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
- 15 जुलैपर्यंत पावसाची शक्यता -
राज्याच्या विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये गडगडाटासह चांगला पाऊस झाला. परंतु, येत्या आठवडय़ात त्याचे प्रमाण फारच कमी असणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. 30 जूनपर्यंत राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस होईल, त्याबरोबर काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीही होईल, असे हवामान विभागाने सांगितले होते. मात्र, आता त्याचा जोर मंदावला आहे. काही जिह्यांमध्ये ढग दाटून येऊनही पाऊस होत नसल्याचे दिसून येत आहे. विश्रांती घेणारा पाऊस 15 जुलैपासून पुन्हा सक्रीय होणार आहे.
- मुंबईत ढगाळ वातावरण, मात्र पाऊस गायब -
मुंबईत ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, अजूनही हवातसा पाऊस पडलेला नाही. मुंबईचा पिण्याच्या पाण्याच्या साठ्याचा विचार केला तर, आता मुंबईतील सात तलावातील पाणीसाठा फक्त 16 टक्के शिल्लक आहे. यामुळे येत्या काळात चांगला पाऊस नाही झाला तर मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.
- कोकणातील पावसाची आकडेवारी -
मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर कोकणसह, घाटमाथ्यावर जोरदार पाऊस झाला. २० जूनपासून कोकणात पावसाचा प्रभाव कमी झाला. सरासरीच्या तुलनेत ४१ टक्के अधिक पाऊस पडला. यामध्ये पालघर, रायगड, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यासह मुंबईत जोरदार पाऊस पडला. मुंबईत सरासरीच्या ५४०.९ मिलिमीटरपैकी ६९४.८ मिलिमीटर पाऊस पडला. सरासरीच्या तुलनेत २८ टक्के अधिक पाऊस पडला. रायगड, रत्नागिरीमध्ये ५० टक्के अधिक पाऊस झाला असून, सिंधुदुर्गमध्ये सर्वात कमी म्हणजेच २५ टक्के अधिक पाऊस पडला आहे.