मुंबई - वांद्रे पूर्व येथील ४८ इंच जलवाहिनी दुरुस्तीचे काम मुंबई महापालिकेच्या जल अभियंता विभागाकडून केले जाणार आहे. या कामामुळे सोमवार ५ ऑक्टोबरपासून मंगळवार ६ ऑक्टोबरपर्यंत वांद्रे आणि धारावी परिसरातील पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद राहणार आहे. त्याचबरोबर परिसरातील काही भागांत ५० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.
मुंबई महानगरपालिकेकडून वांद्रे येथील अँकर ब्लॉक, वांद्रे केबिन, वांद्रे पूर्व येथे ४८ इंच व्यासाच्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सोमवार ५ ऑक्टोबरला दुपारी १२ ते मंगळवार ६ ऑक्टोबर दुपारी १२ वाजेपर्यंत असे २४ तासांसाठी करण्यात येणार आहे. वांद्रे आणि धारावीतील रहिवाशांनी आदल्या दिवशी घरात पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा तसेच पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
या विभागात पाणी बंद
धारावी : मंगळवार ६ ऑक्टोबर
जस्मीन मिल रोड, माटुंगा लेबर कॅम्प या भागांत पहाटे ४ ते दुपारी १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
वांद्रे : सोमवार ५ आणि मंगळवार ६ ऑक्टोबर
वांद्रे टर्मिनस परिसर आणि वांद्रे रेल्वे कॉलनी या परिसरात सोमवार ५ ऑक्टोबर दुपारी १२ वाजेपासून ते मंगळवार ६ ऑक्टोबरला दुपारी १२ पर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
५० टक्के पाणी कपात -
धारावी : सोमवार, ५ ऑक्टोबर
धारावी मेन रोड, गणेश मंदिर रोड, ए. के. जी. नगर रोड, कुंभारवाडा, संत गोरा कुंभार रोड, दिलीप कदम मार्ग या भागात संध्याकाळी ४ ते रात्री ९ वेळेत ५० टक्के पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
कमी दाबाने पाणी पुरवठा -
वांद्रे : मंगळवार, ६ ऑक्टोबर
नवपाडा, निर्मलनगर, बेहरामपाडा, शांतीलाल कंपाऊंड, कलानगर, गोळीबार रस्त्याचा काही भाग, बीकेसी या भागांत पाणीपुरवठा कमी दाबाने राहणार आहे.