मुंबई - सध्या देशात लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. उद्या चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मुंबईतील समाजसेवकाने नामी शक्कल लढवली आहे. उद्या जे कोणी मतदान करून येईल त्यांना एका आंब्याचा पेटीवर एक आंब्याची पेटी मोफत देण्यात येणार आहे. मुंबईतील सायन भागातील समाजसेवक राजेश शिरोडकर हे उद्या (शनिवारी) ही ऑफर देणार आहेत.
ही ऑफर मुंबईतील सर्वच मतदार संघातील लोकांसाठी असणार आहे. हे आंबे त्यांनी आपल्या कोकणातील गावावरून आणले आहेत. बाजार भावापेक्षा कमी दरात 400 रुपयाला आंब्याची पेटी विकून त्यावर मतदान करणाऱ्याला एक पेटी फ्री अशी संकल्पना राबवली आहे. अनेक भागांमध्ये मतदानाची टक्केवारी फारच कमी असते. मतदान करून काय होणार, काही बदल होणार नाही, असा विचार करून नागरिक मतदान करण्यासाठी जात नाहीत. मतदानाचा दिवस सुट्टी म्हणून सिनेमा आणि फिरायला जाण्यात घालवण्यात येतो. अशाच नागरिकांना मतदानासाठी उद्युक्त करण्यासाठी राजेश शिरोडकर यांनी खास ऑफर ठेवली आहे.
शिरोडकर म्हणाले, गेल्या आणि आताच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी देखील जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे यासाठी निवडणूक आयोग, शासन काहीना काही उपक्रम राबवते. त्यात मी हे एक छोटंसं योगदान देत आहे. मतदानाचा टक्का वाढवा हा यामागील उद्देश आहे. लोकांनी मतदानाची सुट्टी न घेता आवर्जुन मतदान करण्यास जायला हवे. मतदान न करता अनेकजण व्यवस्थेवर ताशेरे ओढत असतात. असे न करता या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन लोकशाही बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी उद्या मतदान करावे.