मुंबई - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मनातील पंतप्रधान होण्याची सुप्त इच्छा लपून राहिलेली नाही. बुधवारी वाहिनीवर दिलेल्या मुलाखतीत हे स्पष्ट दिसून येत असल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांनी म्हटले आहे. भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे पंतप्रधान होतील असे कुणालाही वाटले नव्हते, कारण त्यांनी लोकसभा निवडणूक लढविली नव्हती. मनमोहन सिंह त्यावेळी राज्यसभेत होते त्यामुळे ते अचानक पंतप्रधान होऊ शकले, पवारांच्या या विधानाचा संदर्भ देत तावडे म्हणाले, यंदा शरद पवार निवडणूक लढवित नाहीत, पण ते राज्यसभेचे सदस्य आहेत. याचाच अर्थ शरद पवार यांच्या मनात पंतप्रधान होण्याची सुप्त इच्छा आहे. मात्र, पवार यांची सुप्त इच्छा पूर्ण होणार नाही.
काँग्रेस राष्ट्रावादीसह अन्य पक्षांचे जे महागठबंधन आहे, त्यांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार अजूनही ठरलेला नाही, तो निवडणुकीनंतर ठरेल, राहुल गांधी यांना पंतप्रधान होण्याची उत्सुकता नाही, असेही शरद पवार यांनी आपल्या मुलाखतीत म्हटले आहे. तसेच तुटलेल्या फुटलेल्या महागठबंधनमध्ये मायावती, ममता बॅनर्जी या सर्वांनाच पंतप्रधान बनण्याची इच्छा आहे. परंतु, या महागठबंधनमध्ये असलेल्या गोंधळामुळे त्यांचा एक उमेदवार निश्चित होत नाही, या परिस्थितीत देशाची जनताही या गोंधळलेल्या महागठबंधनला मतदान करण्याऐवजी एनडीए महायुतीला मतदान करेल, असा विश्वास तावडे यांनी व्यक्त केला.
अमळनेरचा राडा
अमळनेरमध्ये बुधवारी बी. एस. पाटील आणि उदय वाघ समर्थकांमध्ये हाणामारी झाली. यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनाही धककबुक्की करण्यात आली होती. या घटनेची पक्षाने गांभीर्याने दखल घेतली आहे. पक्षाच्या मेळाव्यात घडली ती घटना अतिशय चुकीची आहे. अशी घटना होणे, हे भाजपला शोभणारे नाही. या घटनेमागे काहीही आणि कोणतेही कारण असले, तरीही या पध्दतीची कुठलीही घटना पक्ष खपवून घेणार नाही, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.