मुंबई - अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘वायू’ चक्रीवादळ बुधवारी मुंबईच्या सागरी क्षेत्रात दाखल झाले. यामुळे मुंबईत दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला.
वायू वादळामुळे हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार मुंबईत जोरदार पावसाला सुरूवात झाली. या चक्रीवादळाचा वेग ताशी १३५ किलोमीटर असून हे तीव्र स्वरूपाचे चक्रीवादळ आहे. हे वादळ १३ जूनपर्यंत गुजरातच्या पोरबंदर आणि वेरावळ किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. सध्या हे चक्रीवादळ मुंबईच्या नैऋत्येला वेगाने सरकत आहे. अरबी समुद्रातील पूर्व-मध्य आणि दक्षिण-पूर्व भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हे चक्रीवादळ निर्माण झाले आहे.