मुंबई - राज्यात सध्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यावरून राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात सध्या मतभेद असल्याचे पहायला मिळत आहे. या वादात आता राज्यातील अनेक विद्यार्थी संघटनांनी उडी घेतली आहे. 'राज्यपाल राज्यातील विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करत नसून ते राजकारण करत आहेत' असा आरोप एनएसयूआय, छात्रभारती संघटना, विद्यार्थी भारती, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आधी विद्यार्थी संघटनांनी केला आहे. तसेच या संघटनांनी राज्यपाल हटावसाठी समाजमाध्यमांवर विविध हॅशटॅग वापरून कोश्यारी यांच्या विरोधात मोहीमच उघडली आहे.
हेही वाचा... 'हा तर राज्यपालांच्या आडून सरकारची कोंडी करण्याचा भाजपचा डाव'
एनएसयूआय या संघटनेने मागील आठवड्यातच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना एक पत्र लिहून महाराष्ट्रातील राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना तात्काळ हटवावे आणि त्यांच्या ठिकाणी नवीन राज्यपालांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली होती. या मागणीला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, छात्रभारती तसेच विद्यार्थी भारती आदी संघटनांनी पाठबळ दिले आहे. त्यामुळे राज्यभरात सध्या राज्यपाल हटाव मोहीम, ही चर्चेचा विषय बनला आहे.
हेही वाचा... राज्यपाल आहेत की विरोधी पक्षनेते? एनएसयुआयची राष्ट्रपतींकडे राज्यपालांना हटवण्याची मागणी
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अॅड. अमोल मातेले यांनी राज्यात अंतिम वर्षांच्या परीक्षेवरून राज्यपाल आणि भाजप घाणेरडे राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. गुजरातमध्ये भाजपचे सरकार आहे. तिथेही अंतिम वर्षाच्या सर्व परीक्षा रद्द केल्या गेल्या आहेत. परंतु, महाराष्ट्रात असा निर्णय घेतला तर भाजप नेते आणि राज्यपाल विरोध करत आहेत. त्यांना हा निर्णय का मान्य नाही? असा सवाल मातेले यांनी केला असून, अजून किती घाणेरडे राजकारण करणार? असा उद्विग्न प्रश्नही विचारला आहे.
हेही वाचा... अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्या, राज्यपालांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र
छात्रभारती या विद्यार्थी संघटनेचे राज्य संघटक सचिन बनसोडे यांनीही राज्यपालांच्या भूमिकेवर आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांच्या हिताच्या विरोधात त्यांचा निर्णय जात असल्याने आम्ही राज्यपाल हटाव मोहीम सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले.
आम्ही राज्यपालांच्या विरोधात ;
#परीक्षा_रद्द_झाल्याच_पाहिजे
#राज्यपाल_हटवा_विद्यार्थी_वाचावा
#गो_बॅक_कोश्यारी
असे हॅशटॅग वापरून फेसबुक आणि ट्विटर वर राज्यपालांना हटवण्यासाठी मोहीम सुरु केली असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा... अंतिम वर्षांच्या परीक्षा कायद्याच्या कचाट्यात सापडतील काय ? जाणून घ्या तज्ज्ञांची मते
विद्यार्थी भारती संघटनेच्या मंजिरी धुरी यांनीही राज्यपाल परिस्थितीचे गांभीर्य न ठेवता परीक्षा घ्या, असे सांगत असल्याचे म्हटले आहे. मात्र, याचे परिणाम किती भयावह ठरू शकतात, याची सर्वसामान्य माणसालाही असताना राज्याचे राज्यपाल इतके बेजबाबदार कसे असू शकतात? असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वटहुकूम जारी करावा आणि देशातील सर्व परीक्षा रद्द कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे. तसेच अपवादात्मक वर्षं म्हणून सर्वच राज्यांमधील अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांना तसेच एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करून पुढील वर्गात प्रवेश द्यावा. तसेच राज्याचे राज्यपाल विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करत नसतील, तर त्यांची पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी मंजिरी धुरी यांनी केली आहे.