मुंबई - जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील ५ ठिकाणच्या लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांसाठी स्वतंत्र व वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्था करण्यात आली होती. या स्वतंत्र व्यवस्थेला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिवसभरात तब्बल ८ हजार ९२ महिलांनी या केंद्रांवर गर्दी करत लसीकरण करून घेतले. वांद्रे-कुर्ला संकुल येथील जम्बो कोविड सेंटर येथे सर्वाधिक लसीकरण करण्यात आले.
५ ठिकाणी लसीकरण -
मुंबईत गेल्या मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रसार आहे. कोरोनाला रोखण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. केंद्र सरकारने कोव्हीशील्ड आणि को - व्हॅक्सिन या दोन लसींना परवानगी दिल्यावर १६ जानेवारीपासून मुंबईत लसीकरणाला सुरुवात झाली. आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्करना लस दिली जात होती. १ मार्चपासून जेष्ठ नागरिक आणि ४५ ते ५९ वर्षांमधील गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. आज जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने मुंबई महापालिकेने सेव्हन हिल रुग्णालय, वांद्रे कुर्ला संकुल जम्बो सुविधा केंद्र, नेस्को गोरेगांव जम्बो सुविधा केंद्र, मुलुंड जम्बो सुविधा केंद्र आणि दहीसर जम्बो सुविधा केंद्रावर अशा ५ ठिकाणी खास महिलांसाठी लसीकरण करण्याची व्यवस्था केली होती. त्याठिकाणी आज दिवसभरात तब्बल ८ हजार ९२ महिलांनी या केंद्रांवर गर्दी करत लसीकरण करून घेतले. अनेक लसीकरण केंद्रांवर महिला दिनाच्या निमित्ताने लसीकरणासाठी येणाऱ्या महिलांचे गुलाबाचे फुल देऊन स्वागतही करण्यात येत होते. काही ठिकाणी गुलाबाच्या फुलांसोबतच चॉकलेट, सरबत किंवा नाष्ता अशीही व्यवस्था करण्यात आली होती, अशी माहिती महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.
असे झाले लसीकरण -
वांद्रे-कुर्ला संकुल येथील जम्बो कोविड सेंटर येथील लसीकरण केंद्रात १ हजार ९८२ महिलांचे लसीकरण करण्यात आले. या खालोखात गोरेगांव परिसरातील नेस्को जम्बो कोविड सेंटर येथील लसीकरण केंद्रात १ हजार ९३२, अंधेरी परिसरातील सेव्हन हिल्समध्ये १ हजार ९०८, दहीसर येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये १ हजार ८५२ तर मुलुंड येथील जम्बो कोविड सेंटर येथील लसीकरण केंद्रात ४१८ महिलांचे लसीकरण करण्यात आले. एकूण ८ हजार ९२ महिलांचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.