मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेनेमधील वाद मोठ्या प्रमाणात चिघळलेला आहे. नुकत्याच शिवसेनेत प्रवेश केलेल्या मराठमोळ्या बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी अभिनेत्री कंगना राणौतला खोचक टोला लगावला आहे. कंगनाच्या एका वक्तव्यावरून 'बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ', असे टि्वट मातोंडकर केले आहे.
कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरसोबत केली होती. तेव्हापासून शिवसेना आणि कंगना असा सामना रंगला होता. शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि कंगना यांच्यामध्ये टि्वटर वॉर सुरू होता. शिवसेनेसोबतच्या वादामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या कंगना रणौतने मंगळवारी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी कंगनाने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर टीका केली. मला मुंबईत राहण्यासाठी केवळ गणपती बाप्पाच्या परवानगीची गरज आहे. मी इतर कोणाकडेही परवानगी मागितली नाही, असे सांगत कंगनाने शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला.
कंगनाचे टि्वट -
माझ आवडतं शहर मुंबईच्या शहराच्या बाजूनं उभं राहिल्यामुळे मला विरोध आणि शत्रुत्त्व सहन करावं लागलं. मी आज मुंबा देवी आणि श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. आता मला सुरक्षित वाटतेय, असे टि्वट कंगनाने केलं. या टि्वटवरून उर्मिला मातोंडकर यांनी कंगनाला बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ, असे खोचक ट्वीट करत टोला लगावला.
यापूर्वीही कंगनाला मातोंडकर यांनी खडसावलं होत -
कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरसोबत केली होती. तेव्हा कंगनाला मातोंडकर यांनी फैलावर घेतलं होते. महाराष्ट्र हा संपूर्ण देशाचा सांस्कृतिक आणि बौद्धिक चेहरा असून ही छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यभूमी असल्याचे ट्वीट उर्मिलाने केलं होतं. हे सर्व शॉकिंग असल्याचं त्यांनी म्हटलं. मुंबईने कोट्यवधी भारतीयांना स्वत:ची ओळख दिली आहे. केवळ कृतघ्न लोक याची तुलना पीओकेशी करू शकतात, असे उर्मिलाने म्हटले.
कंगना रणौत आणि शिवसेनेत ट्विटर वाद -
यापूर्वी कंगनाने प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंहच्या आत्महत्येवरून महाराष्ट्र सरकार, मुंबई पोलिसांवर टीका केली होती. इतकचं नव्हे तर तीने पाकव्याप्त काश्मिरसोबत मुंबईची तुलना केली होती. त्यानंतर या वादानंतर कंगनाने आपल्याला मुंबईत पुन्हा येऊ नको, अशा धमक्या दिल्या जात आहेत, असे सांगितले होते. तसेच आपण 9 तारखेला मुंबईत येत असून कोणच्या बापामध्ये हिंमत असेल तर रोखून दाखवा, असे आव्हानही तीने दिले होते. यानंतर ती मुंबईत आली होती. यावेळी अनेक शिवसैनिकांनी तिच्याविरोधात घोषणाबाजी करत मुंबई विमानतळावर गर्दी केली होती. दरम्यान, कंगना मुंबईत दाखल होण्यापूर्वीच मुंबई महापालिकेकडून तीचे अवैध कार्यालय देखील पाडले. आपले कार्यालय तोडल्यामुळे कंगनाने महाराष्ट्र मुख्यमंत्र्यावर जोरदार टीका केली होती. अनेक दिवस अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेनेत ट्विटरवाद वाद सुरू होता.
हेही वाचा - सिद्धिविनायकाच्या परवानगीनेच मी मुंबईत - कंगना