मुंबई - अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. रश्मी ठाकरे यांनी शिवबंधन बांधत त्यांच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब केले. यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी हिंदूत्त्व, कंगना रणौत तसेच काँग्रेस सोडण्याबाबत त्यांनी संवाद साधला. यावेळी शिवसेनेत प्रवेश करण्याबाबत कोणताही दबाव नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ट्रोलींग म्हणजे माझासाठी 'मेडल्स'
आपल्या देशात लोकशाही आहे. त्यात बोलण्याचा अधिकार सर्वांना आहे. त्याचप्रमाणे टीका करण्याचाही अधिकार आहे. मलाही सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. याचा अर्थ मी योग्य मार्गावर आहे, असे मी समजते. मी मराठी मुलगी आहे. काही केल्या पाऊल मागे घेणार नाही, असा इशारा उर्मिला मातोंडकर यांनी भाजपाचे नाव न घेता दिला आहे.
उद्धव ठाकरेंचा फोन
मी पक्षात प्रवेश करावा, म्हणून खुद्द उद्धव ठाकरे यांचाही फोन आला होता. महाराष्ट्राची परंपरा मोठी असून कला क्षेत्रातील लोकांनी विधानपरिषदेत येऊन दर्जा वाढवला पाहिजे, असे वक्तव्य ठाकरे यांनी केले. यामुळे तुमच्यासारख्या व्यक्तींची गरज आहे, असे ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्त्व योग्य आहे. त्यांच्या नेतृत्वात सरकार चांगले काम करत आहे. म्हणून शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे मातोंडकर म्हणाल्या. शिवसेनेत प्रवेश केला असला, तरी आजही काँग्रेसच्या सोनिया आणि राहुल गांधी तसेच बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल आदर असल्याचे मातोंडकर यांनी सांगितले.