मुंबई - हजारो कोटी रुपयांच्या तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला बाहेर काढण्यासाठी उत्तर प्रदेशाचा फॉर्म्यूला एसटी महामंडळ वापरणार आहे. ज्यामध्ये उत्तर प्रदेशाच्या धर्तीवर एसटी महामंडळ प्रवाशांच्या सोयीसाठी भाडेतत्त्वावर ५०० साध्या गाड्या घेणार आहे. त्यामुळे एसटीच्या तोटा कमी होणार असून प्रवाशांना उत्तम सुविधा उपलब्ध होणार आहे.
संचित तोटा ९ हजार कोटीच्या घरात -
देशभरातील विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य देशांच्या इतर राज्यामध्ये सर्वाधिक पुढे आहे. देशांचे इतर राज्यही महाराष्ट्राच्या विकास प्रारुपाचा अभ्यास करण्यासाठी आपल्या राज्यात येतात. मात्र तोट्यात चालणार्या एसटी महामंडळावर उत्तर प्रदेशाच्या एसटी महामंडळाचा फॉर्म्यूला वापरण्याची वेळ आली आहे. गेल्या वर्षी राज्यातील एसटी महामंडळातील तोटा कसा कमी करता येईल. यासाठी एसटी महामंडळाचे चार सदस्यीय शिष्टमंडळ उत्तर प्रदेशाच्या एसटी महामंडळाचा अभ्यास करण्यासाठी गेल्या वर्षाच्या सुरुवातीला गेले होते. नंतर, मार्च महिन्यात कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाले. तेव्हापासून आजपर्यत एसटी महामंडळाचा तोटा ४ हजार ५०० कोटी रुपयांवरून थेट ९ हजार कोटींच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे आत एसटी महामंडळाचा उत्तर प्रदेशाचा फॉर्म्यूला स्वीकारण्याची वेळ आली आहे.
काय आहे उत्तर प्रदेशाचा फॉर्म्यूला -
उत्तर प्रदेशाच्या एसटी महामंडळात सध्या ११ हजार ३९३ बसेसचा ताफा असून यातील दररोज ९ हजार २३३ बसेस रस्त्यावर धावतात. यातील २ हजार ९१० बसेस या भाडेतत्त्वावर धावत आहेत. एकूण बसेसपैकी ३० टक्के बसेस उत्तर प्रदेशच्या एसटी महामंडळात खासगी बसेस आहे. या बसेसच्या ताफ्यानुसार उत्तर प्रदेशच्या एसटी महामंडळात फक्त २१ हजार १० कर्मचारी आहेत. त्यामुळे प्रति बसेसवर फक्त ३ कर्मचारी आहेत. या उलट महाराष्ट्राच्या एसटी महामंडळात १७ हजार १०० बसेसचा ताफा असून ९३ हजार कर्मचाऱ्यांची संख्या असून प्रति बसेसवर ७ कर्मचारी आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशाच्या एसटी महामंडळाच्या तुलनेत राज्याचा एसटी महामंडळावर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. परिणामी दरवर्षी एसटी महामंडळाचा तोटा वाढत जात आहे.
भाडेतत्त्वावर बस गाड्या नवा फॉर्म्यूला -
उत्तर प्रदेशाचा फॉर्मूला एसटी महामंडळ वापरणार आहे. ज्यामध्ये उत्तर प्रदेशाच्या धर्तीवर एसटी महामंडळ प्रवाशांच्या सोयीसाठी भाडेतत्त्वावर ५०० गाड्या घेणार आहे. या गाड्या स्वतः एसटी महामंडळाकडून कंपनीला पुरवणार असून या बस गाड्यांची रंगसंगती एसटी महामंडळ ठरवणार आहे. विशेष म्हणजे या भाडेतत्त्वावर घेणाऱ्या गाडया, लागणारे इंधन सुद्धा महामंडळाकडून रोखीने पुरविण्यात येणार आहे. तसेच या भाडेतत्त्वावरील गाडयांना राज्यातील फायदेशीर मार्ग देण्यात येणार आहेत. सध्या एसटी महामंडळाच्या बसेसला एक किलोमीटर धावण्यासाठी ४४ रुपये इतका खर्च येत आहे. मात्र, भाडेतत्त्वावरील गाडयांना २५ ते ३० रुपये खर्च येणार असून १४ रुपयांची बचत होणार आहे. अशी माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याचा अटीवर दिली आहे. याबाबत 'ईटीव्ही भारत'ने एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना विचारणा केली असताना, त्यांनी सांगितले की, ५०० बसेस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय अद्यापही झालेला नसून सदर बाब विचाराधीन आहे.
उत्पन्नापेक्षा खर्च जास्त -
एसटी महामंडळाला दर वर्षी प्रवासी उत्पन्न व इतर उत्पन्नाचे स्त्रोत धरून फक्त 7 हजार 800 कोटी इतके उत्पन्न मिळते. तर एसटी महमंडळाच्या ९८ हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वेतनावर वर्षाला 3 हजार 500 कोटी रुपये खर्च होतो. तर साधारणतः इंधनावर 3 हजार कोटी आणि स्पेअर पार्ट, टायर व इतर खर्च साधारण 600 कोटी इतका खर्च येतो. गेल्या काही वर्षांपासून एसटीच्या प्रवासी संख्येत घट होत असल्याने एसटीचा संचित तोटा वाढत आहे. याशिवाय देशातील इतर राज्यातील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या तुलनेत महाराष्ट्रतील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वेतन कमी आहे. याउलट उत्तर प्रदेशाचा एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू झालेला आहे. मात्र, राज्यातील एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना कमी पगार सुद्धा वेळेत मिळत नसल्याचे वास्तव आहे.
एसटीला होणार फायदा -
राज्यातील एसटी महामंडळाची अशीच स्थिती राहिली तर भविष्यात अपेक्षित वेतन मिळण्यासाठी अडचणी निर्माण होतील. त्यासाठी व सर्वसामान्य प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी आता ही वेगळी आकर्षक योजना अमलात आणण्याचा विचार महामंडळ करीत आहे. विशेष म्हणजे शिवशाही भाड्याने घेतल्यानंतर ज्या त्रुटी आढळल्या व त्याचा आर्थिक फटका महामंडळाला बसला. त्याची पुनरावृत्ती होऊ नये. यासाठी जोर- बैठका विचारविनिमय सुरू आहे. ही नवी योजना महामंडळाला उर्जितावस्था प्राप्त करून देणारी ठरेल असेही या संबंधात प्रत्यक्ष काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले.