मुंबई - मिशन ब्रेक दी चेन अंतर्गत तीन दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात निर्बंध लादण्यात आले आहे. मानखुर्दमध्ये दुकाने बंद आहेत मात्र फेरीवाल्यांकडून कसल्याच प्रकारचे नियम पाळले जात नाहीत. मोठ्या प्रमाणात नागरिकही भाजी मार्केटमध्ये गर्दी करत आहेत. त्यामुळे दुकानदार व व्यापारी संताप व्यक्त करत आहेत. फक्त दुकानदारांनाच निर्बंध का? असा सवाल व्यापारी वर्गाने केला आहे.
सर्व दुकाने बंद असल्याने फेरीवाले दोन-तीन गाडे लावून बसला आहे. स्थानिक नागरिकांनाही कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव बदल कसलेच गांभीर्य नाही. स्थनिक प्रशासनाकडून फेरीवाल्यांना कोणतेच निर्बंध न लावल्याचे चित्र दिसत आहे. हे सर्व फेरीवाले मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. सायंकाळी पाच ते आठपर्यंत येथे बाजार भरतो आणि त्यामध्ये नागरिकांना चालण्यासाठीही जागा नसते. दुकाने बंद असल्यामुळे फेरीवाल्यांचे चांगलेच फावले आहे. जास्त किमतीत वस्तू विक्री केली जात आहे. याकडे स्थानिक पोलीस प्रशासन कसलीही कारवाई करताना दिसत नाही.
मानखुर्द मधील फेरीवाल्यांचा सुळसुळाट पाहिल्यानंतर कोरोनाचा संसर्ग फक्त दुकाने सुरू ठेवल्यामुळे वाढतो का? असाही सवाल मानखुर्द व्यापारी वर्गाने केला.
दुकाने उघडण्याचे आदेश लवकर जाहीर करा, अशी मागणी देखील त्यावेळी व्यापारी वर्गाने महाराष्ट्र सरकारकडे केली. ब्रेक दि चेन अंतर्गत आणलेल्या निर्बंधामुळे व्यापार क्षेत्राचे कंबरडे मोडले जात आहे. बाकी सर्व सोडले आणि दुकाने मात्र बंद केली गेली. या बदलही व्यापारी वर्गात असंतोष पाहायला मिळाला.