मुंबई - मराठी माणसाने रक्त सांडून मुंबई मिळवलेली आहे. आता ती तोडण्याचे मनसुबे रचले जात आहेत. त्यांच्या पोटात असलेले ओठावर आले आहे. मात्र, मुंबईचा ( Uddhav Thackeray news Mumbai bkc ) लचका तोडणाऱ्यांचे तुकडे केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा घणाघात शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray on Mumbai ) यांनी आज मुंबईतील बीकेसी मैदानात झालेल्या विराट जाहीर सभेत केला.
हेही वाचा - Uddhav Thackeray's meeting : हिंदुत्व, विकास आणि शिवसेना
यावेळी मुख्यमंत्र्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेला लक्ष्य करणार्या भाजप - मनसेचा उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला. काश्मिरी पंडित, बाबरी मशीद, भोंगे आदी विषयांवर परखड भाष्य करत त्यांनी चौफर फटकेबाजी केली.
टिनपाटांना केंद्राची सुरक्षा - भाजपावर मुख्यमंत्र्यांनी आज जोरदार हल्ला चढविला. कोणाच्या हातात भोंगा द्यायचा, हनुमान चालीसा लावायची आणि पत्रकार परिषद घेवून टॉमॅटो बसतात, अशी टीका किरीट सोमय्या यांचे नाव न घेता त्यांनी केली. तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकविणारे कोण, असा सवाल त्यांनी केला. भोके पडलेल्या टिनपाटांना केंद्राची सुरक्षा दिली जात आहे, असा हल्ला उद्धव ठाकरे यांनी भाजपावर चढविला. बाबरी मशीद पाडली तेव्हा तुमचे वय काय होते, तुम्ही बाबरी मशिदीवर चढला असता तर तुमच्या वजनाने ती मशीद पडली असती, अशी खोचक टीका मुख्यमंत्री यांनी फडणवीस यांच्यावर केली. आज ईडी लावून घोटाळेबाजांना पवित्र केले जात आहे. उद्या ते दाऊदलाही मंत्री बनवून पवित्र करतील, असे उपहासाने उद्धव ठाकरे म्हणाले.
अडीच वर्षांपूर्वी गाढवाला लाथ मारली - आमचे हिंदुत्व देवळात घंटा बडवणारा नाही अतिरेक्यांना बडवणारा आहे. आमचे हिंदुत्व गदाधारी. गाढवाने लाथ मारायच्याआधी आम्हीच लाथ घातली. आज एक भ्रम निर्माण केल्या जात आहे की, हिंदुत्वाचे रक्षक भाजपच. इथे जमलेला हिंदू हा मेल्या आईचे दूध पिलेला नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
युतीत सडलो - आमची युतीत २५ वर्षे सडली. आज विश्वास बसत नाही. किती वाईटपणाने समोर येतय. सामनात जे येते ते देशाच्या हिताचे. वाजपेयी पेट्रोल दरवाढ झाल्यावर बैलगाडीतून संसदेत गेले होते. तो संवेदनशील भाजप कुठे आहे?
नवनीत राणा यांना टोला - तुमचे विकृत हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. दुर्दशेकडे आपण चाललो आहोत. तुमच्यावर विश्वास टाकला, त्यांनी गळा कापल्यास विश्वास कोणावर ठेवावा, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. सुसंकृतपणा जपणे हे हिंदुत्व असल्याचा टोला खासदार नवनीत राणा यांचा नामोल्लेख न करता त्यांनी लगावला.
थाळ्या रिकाम्याच - रिकाम्या थाळ्या रिकाम्याच आहेत. महाराष्ट्र पुढे जातोय. कायदा सुव्यवस्थेचे बारा वाजले, असे वातावरण तयार केले जात आहे. कोरानाच्या काळात थाळ्या वाजवा, असे सांगितले होते. मात्र, त्या रिकाम्या थाळ्या अजूनही रिकाम्याच आहेत, असा घणाघात पंतप्रधान मोदी यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी केला. महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम केले जात असल्याचे ते म्हणाले.
राज ठाकरेंचा केमिकल लोचा - काहीजण शाल घालून मुन्नाभाईसारखे फिरतात. त्यांना फिरू द्या, त्यांना बाळासाहेब ठाकरे झाल्यासारखे वाटते. मात्र, त्यांना नंतर कळते की आपल्यात काही केमिकल लोचा झाला आहे, अशा शेलक्या शब्दात राज ठाकरे यांचाही उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला.
उत्तर द्यायची असतील तर महागाई वर द्या. ही केवळ गर्दी नाही हे सगळे वाघ आहेत. गेल्या वेळी त्यांनी भगव्या टोप्या घातल्या, पण भगवा मेंदूत असतो टोपीत असेल तर संघाची टोपी काळी का? तुमचे विकृत हिंदुत्व आहे. शिवसेनाप्रमुखांनी विचार दिला, तुम्ही त्याचा विकार केला. ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांनीच केसाने गळा कापला.
बीकेसी येथे शिवसेनेची शिवसंपर्क अभियान सभा झाली. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, संजय राऊत, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, शिवसेनेचे मंत्री, नेते, पदाधिकारी आणि लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा - मुंबईत एनसीबीची मोठी कारवाई दीड कोटींचे ड्रग्ज जप्त