मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना 59 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच शिवसैनिकांनी मातोश्रीवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. मातोश्री येथे स्टेज उभारण्यात आला आहे. येथून उद्धव ठाकरे शिवसैनिकांच्या शुभेच्छा स्वीकारत होते.
नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले सचिन अहिर हे देखील उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते. अहिर हे स्टेजवरही जास्त काळ उपस्थित होते. अनेक नेत्यांना स्टेजवर येऊ दिले जात नव्हते. पंरतु अहिर यांना जास्त महत्व दिले जात होते. हे पाहून शिवसैनिक अवाक होत होते. अहिर यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात येईल का? अशी चर्चा शिवसैनिकांमध्ये सुरू होती.
मुंबईत मुसळधार पाऊस असला तरी शिवसैनिकांनी या ठिकाणी गर्दी केली आहे. सकाळपासून विविध भेटवस्तू घेऊन ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिक येत आहेत. मातोश्रीचा परिसर फुलांनी सजवण्यात आला आहे. उपविभाग प्रमुख अशोक माटेकर यांनी आणलेला केक बघायला सर्वांची गर्दी झाली होती. विधानभवनचे चित्र आणि येत्या निवडणुकीत विधानसभेवर भगवा, असा संदेश यावेळी देण्यात आला होता.