मुंबई - जगभरात मंदीचे वातावरण आहे. मात्र, बेस्ट कामगारांची नोकरी सुरक्षित राहील, तसेच मंदीच्या काळातही पगारवाढ करण्यात येईल, असे वक्तव्य शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केले आहे. कुलाबा येथील बेस्ट मुख्यालयात बस ट्रॅकिंग अॅप तसेच बेस्टच्या ताफ्यात दाखल झालेल्या 10 इलेक्ट्रिकल बसचे उद्घाटन करताना त्यांनी देशभरात मंदी असल्याचे मान्य केले.
मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये मोबाईलचा उपयोग 'नेटफ्लिक्स'साठी न करता बेस्ट अॅपचा वापर करण्यासाठी करा, असा उपदेशही त्यांनी केला. बेस्ट गाड्या गॅरेज मध्ये दुरुस्त करता येतात, पण माणसाचं तस करता येत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
हेही वाचा उध्दव ठाकरेंनी घेतले कृपाशंकर सिंह यांच्या गणपतीचे दर्शन
आदित्य ठाकरे यांनी इलेक्ट्रिकल बससंदर्भात पाठपुरावा केल्याबद्दल उध्दव ठाकरे यांनी त्यांचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या प्लास्टिक बंदीचे ही त्यांनी आभार मानले आहेत. इलेक्ट्रिकल बस आधी आमच्या विभागात चालवा, असे भाजपचे नगरविकास मंत्री योगेश सागर यांनी म्हणताच, 'आधी युतीमध्ये आमच्या वाट्याला किती जागा येतात ते सांगा; बसची संख्या नंतर ठरवू', अशा शब्दांत उध्दव ठाकरे यांनी बस वाटपाबाबत टोला लगावला.
हेही वाचा सावरकरांवर विश्वास नसणाऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी फटके मारायला हवेत - उद्धव ठाकरे
'विषारी नागांना सांगा की तुमची नागपंचमी झाली, तुझ्याकडे फक्त पुंगी राहिली. आम्हाला डोलवत बसू नका; आमच्या पाठीशी शिवसेना उभी आहे', असा टोला देखील उध्दव ठाकरे यांनी नारायण राणेंना लगावला आहे.