मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया इमारतीच्या काही अंतरावर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील जिलेटीन स्फोटके सापडले होते. यासंदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून तपास केला जात असताना आणखी 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. जे या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे याचे खास हस्तक मानले जातात. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून संतोष आत्माराम शेलार आणि आनंद पांडुरंग जाधव या दोघांना अटक करण्यात आल्यानंतर या दोघांच्या आतापर्यंत झालेल्या चौकशीत काही बाबी समोर आलेल्या आहेत.
आनंद जाधव यांची गाडी तर संतोष शेलार होता चालक
काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणेने गोरेगाव परिसरामधून एक टवेरा गाडी जप्त केलेली होती. ही गाडी आनंद जाधव यांच्या नावावर असून याच गाडीत मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आल्याचा संशय राष्ट्रीय तपास यंत्रणेला आहे. ज्या वेळी या गाडीमध्ये मनसुख हिरेन याला बसवण्यात आले होते, त्यावेळी संतोष शेलार ही व्यक्ती ही गाडी चालवत होता, असा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने केलेला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून जप्त करण्यात आलेली टवेरा गाडी ही पुण्याला फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवलेली आहे. सचिन वाझे हे या दोघांना बऱ्याच वेळा भेटलेला होता. या बरोबरच सचिन वाझे यानी या दोघांसोबत इतर आरोपींची भेट करून दिलेली होती. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयाने 21 जूनपर्यंत कोठडी सुनावली आहे. दरम्यान याप्रकरणी सचिन वाझे यांच्यासह क्राइम ब्रांच अधिकारी सुनील माने, रियाज काजी, यांच्यासह लखन भैया एन्काऊंटर प्रकरणातील बडतर्फ पोलीस कर्मचारी विनायक शिंदे यांना अटक केलेली आहे.
हेही वाचा -नाशिक-पेठ राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीचा भीषण अपघात; दोन जण जागीच ठार