मुंबई - अमली पदार्थाचे धागेदोरे हे बॉलीवूडपर्यंत पोहोचल्यानंतर आज नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. झोमॅटोसारख्या कंपनीत फूड डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 9ने अटक केली आहे. उस्मान अन्वर अली शेख असे आरोपीचे नाव आहे. हा आरोपी बॉलिवूडच्या कलाकारांना अमली पदार्थ देत होता, असा पोलिसांना संशय आहे.
उस्मान अन्वर अली शेख (40) हा जोगेश्वरी येथील एका मॉलजवळ अमली पदार्थ घेऊन येणार असल्याचे पोलिसांना कळले होते. त्यानंतर पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात आरोपीला अमली पदार्थांसह अटक करण्यात आलेली आहे. आरोपीच्या चौकशीत मिळालेल्या माहितीवरून अबू सुफियान यालाही अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही आरोपी बॉलीवूडमधल्या काही कलाकारांना अमली पदार्थांचा पुरवठा करत असल्याचेही गुन्हे शाखेच्या चौकशीत समोर आले आहे. अटक आरोपी उस्मान याच्याकडून पोलिसांनी 139 ग्रॅम एमडी जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत साडेपाच लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा-दीपिकाच्या उत्तराने एनसीबी अधिकाऱ्यांचे समाधान नाही
दोन्ही आरोपींनी बॉलीवूडमधल्या कुठल्या कलाकारांना अमली पदार्थांचा पुरवठा केला, याचा तपास गुन्हे शाखेचे पथक करत आहे. त्याबाबत आणखी काही कलाकारांना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे.