मुंबई- मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळा प्रकरण उघड केले आहे. त्यामुळे चॅनेलच्या टीआरपीचा विषय चर्चिला जात आहे. दरम्यान, या टीआरपी घोटाळ्याची चौकशी आर्थिक गुन्हे शाखे (EOW) कडून करण्यात येणार आहे. मुंबई पोलीस दलाची आर्थिक गुन्हे शाखा ही चौकशी करणार असून, पोलीस उपायुक्त पराग मणेर यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाची तपासणी होणार आहे.
भारतात सध्या 400 हून अधिक वेगवेगळ्या भाषांतील वाहिन्यांचे प्रक्षेपण होते. जवळपास 32 हजार कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या या क्षेत्रात टीआरपी'ला घेऊन नेहमीच स्पर्धा होते. खोटा टीआरपी दाखवून काही चॅनेल्सनी आर्थिक फायदा मिळवल्याचा पोलिसांना संशय आहे. यात आर्थिक फसवणूक झाल्याची प्राथमिक माहिती उघड झाली आहे. आता या टीआरपी घोटाळ्याची चौकशी आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे.
खोटा टीआरपी दाखवून मिळवला आर्थिक फायदा
पोलिसांकडून टीव्ही चॅनल्स टीआरपी घोटाळ्याचा एक मोठा खुलासा करण्यात आला होता. आपल्या चॅनेलचा टीआरपी जास्त यावा, यासाठी काही चॅनल्स संबंधितांना पैसे देऊन दिवसभर टीव्ही सुरू ठेवत सबंधीत चॅनल लावण्यास सांगत होते. हे रॅकेट देशासह विदेशातही अस्तित्वात असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंह यांनी दिली होती.
अशी होते 'टीआरपी' सोबत छेडछाड
ज्या घरात गोपनीय मापदंड (कॉन्फिडेंशियल पॅरामिटर) लावण्यात आले होते. त्यातील डेटा हा दुसरा चॅनल सोबत शेअर करण्यात येत असल्याचा दावा मुंबई पोलिसांकडून करण्यात आला आहे. या शेअर करण्यात आलेल्या कॉन्फिडेंशिय डेटासोबत छेडछाड करण्यात येत होती. काही घरांमध्ये ते एका विशिष्ट वाहिनीला सतत चालू ठेवण्यात यावे, म्हणून सांगण्यात येत होते. यासाठी एजन्सीकडून पैसेसुद्धा दिले जात होते. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून या दोन्ही आरोपींच्या बँक खात्यातून प्रत्येकी 10 लाख व 8 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.
यासंदर्भात काही फरार आरोपींचा मुंबई पोलिसांकडून शोध घेण्यात येत असून आर्थिक गुन्हे शाखा देखील या प्रकरणाची चौकशी करणार आहे. यापुर्वी टीआरपीचे मोजमाप करणाऱ्या बीएआरसी (ब्रॉडकास्ट ऑडीयन्स रिसर्च कौन्सिल) म्हणजेच प्रसारण प्रेक्षक संशोधन परिषद या संस्थेच्या एका हंसा नावाच्या एजन्सीवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे.