मुंबई - विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना शुक्रवारी भाईंदर येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमार्फत सुरू करण्यात आलेले प्रशिक्षण आज दुपारी अर्ध्यावरच रोखण्यात आले. काँग्रेसचे नेते राजीव सातव यांनी शुक्रवारी यासाठी आक्षेप घेतले होते. त्याची गंभीर दखल आज घेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी हे प्रशिक्षण तातडीने थांबविण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रानंतर प्रशिक्षण स्थगित करण्यात आले.
म्हाळगी प्रबोधिनीने भाईंदर उत्तन येथे मुंबई विद्यापीठातील सहाय्यक कुलसचिव, उपकुलसचिव व सक्षम अधिकारी यांच्यासाठी प्रशासकीय कामकाजाच्या मार्गदर्शनासाठी 31 जानेवारी व 1 फेब्रुवारी या कालावधीत प्रशिक्षण शिबिर आयोजित केले. प्रथम टप्प्यात विद्यापीठातील 30 अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी विद्यापीठाने अधिकाऱ्यांची निवड केली. त्यानुसार हे प्रशिक्षण शुक्रवारी सुरू झाले होते. त्यावर राजीव सातव यांनी म्हाळगी प्रबोधिनीमार्फत प्रशिक्षण देण्यास विरोध केला. याबाबतची तक्रार त्यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे केली होती. याची दखल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेत दुसऱ्या दिवशीचे प्रशिक्षण तातडीने स्थगित करण्याचे आदेश दिले.
प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवसातील पहिले सत्र पूर्ण झाल्यानंतर विद्यापीठाकडून प्रशिक्षण थांबविण्यात आले. यानंतर विद्यापीठातील अधिकारी उर्वरित दोन सत्रे पूर्ण न करताच शिबिराच्या ठिकाणाहून परतले. विद्यापीठाने पुर्वीपासून प्रशिक्षण शिबिराचे नियोजन केले होते. अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार हे प्रशिक्षण तातडीने थांबविण्यात आले असल्याचे, विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, विद्यापीठाने अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या पैशांचा गैरवापर केला आहे. म्हाळगी प्रबोधिनीमार्फत प्रशिक्षण देण्याच्या निर्णयाची चौकशी करावी. याप्रकरणी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी एनएसयूआय संघटनेचे राष्ट्रीय सचिव निखिल कांबळे यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेनेही या प्रशिक्षणावर आक्षेप घेत या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.