मुंबई - राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार राज्यात आज 352 रुग्ण आढळून आले आहेत. त्यात मुंबईत महापालिका हद्दीत 242, पुणे महापालिका हद्दीत 39, मालेगाव महापालिका हद्दीत 14, ठाणे महापालिका हद्दीत 9, मिरा भाईंदर महापालिका हद्दीत 7, पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत 6, वसई विरार महापालिका हद्दीत 5 असे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर इतर जिल्ह्यांमध्ये कमी प्रमाणात रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 2334 वर पोहचला आहे. आज राज्यात ११ कोरोना झालेल्या रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ही १६० वर पोहोचली आहे.
आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे 9 आणि पिंपरी चिंचवड तसेच मीरा भाईंदर येथील प्रत्येकी 1 रुग्ण आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी 4 पुरुष तर 7 महिला आहेत. झालेल्या 11 मृत्यूपैकी 6 जण हे 60 वर्षांवरील आहेत 5 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या 11 जणांपैकी 8 रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड 19 म्हणजेच कोरोनाची लागण झाल्याने राज्यातील मृत्यूंची संख्या 160 झाली आहे. आज राज्यातून २२९ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.
क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना –
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात आज एकूण 4223 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी 15.93 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.