मुंबई - महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी 21 मे रोजी मतदान होणार आहे. या 9 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच आज शेवटचा दिवस आहे. रविवार पर्यंत सर्वच पक्षांनी आपापल्या जागेवरील उमेदवार घोषीत केले. भाजपकडून नावांची घोषणा झालेल्या उमेदवारांनी या अगोदरच आपले नामांकन दाखल केले आहे.महाविकास आघाडीचे उमेदवार आज (सोमवारी ) आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.
हेही वाचा... विधानपरिषद निवडणूक: संजय राऊतांनी मानले काँग्रसचे आभार
विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर 9 जागांसाठी सर्वच पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले. मात्र, महाविकास आघाडीतील काँग्रेसने दोन उमेदवार जाहीर केल्याने निवडणूक होणारच अशी चर्चा सुरु झाली. मात्र, जागा वाटपाबद्दल रविवारी तोडगा निघाल्यानंतर निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
विधान परिषदेसाठी हे उमेदवार रिंगणात..
भारतीय जनता पक्षाकडून विधान परिषदेच्या चार जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यात प्रविण दटके, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांचा समावेश आहे. या उमेदवारांनी या अगोदरच उमेदवारी अर्ज भरले आहेत. शिवसेनेकडून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, नीलम गोऱ्हे हे रिंगणात आहेत. काँग्रेसने राजेश राठोड आणि राजकिशोर उर्फ पापा मोदी यांच्या नावाची घोषणा केली होती. त्यातील राजकिशोर उर्फ पापा मोदी यांचे नाव मागे घेतल्याने आता काँग्रेसकडून फक्त राजेश राठोड रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांच्या नावाची घोषणा झाली आहे.
उरलेले सर्व उमेदवारी आज आपले नामांकन दाखल करतील. तसेच गुरुवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.