मुंबई - दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर आज (गुरूवार) गणरायाला निरोप देण्याची वेळ आली आहे. अनंत चर्तुदशीच्या दिवशी सकाळपासून दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत विसर्जन मिरवणुका सुरू राहतात. मात्र, यावर्षी मुंबईतील गणेशविसर्जन मिरवणूक शनिवारी पहाटेपर्यंत लांबण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
शहरातील २० रेल्वे उड्डाणपूल धोकादायक बनले आहेत. त्यामुळे या मार्गांवरून विसर्जन मिरवणुकीतील गणेशभक्तांना गटागटाने सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेत विसर्जन मिरवणुका रखडण्याची चिन्हे आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील २० पूल धोकादायक म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या पुलावर १६ टनांपेक्षा जास्त अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. मात्र, गणेशोत्सव मंडळांच्या मागणीमुळे त्यांना या पुलांवरून विसर्जन मिरवणुका नेण्याची परवानगी महानगरपालिका व पोलिसांनी दिली. चिंचपोकळी आणि करीरोडच्या पुलांबाबत नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - गणपती विसर्जनासाठी मुंबई पालिका सज्ज ; ६९ नैसर्गिक स्थळे, ३२ कृत्रीम तलावांची सोय
खड्डे, पाऊस या बरोबरीनेच पुलांच्या सुरक्षेचे अडथळे मंडळांना पार करावे लागणार आहेत. या मिरवणुकीवेळी महानगरपालिका प्रशासन, पोलीस आणि गणेश मंडळांचे कार्यकर्ते यांची कसोटी लागणार आहे. परिणामी लालबाग, परळमधील मंडळांचे विसर्जन लांबण्याची शक्यता आहे. दरम्यान मंडळांनी विसर्जन मिरवणुका लवकर सुरू कराव्यात, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
दुपारी चार वाजेपर्यंत सर्वाधिक ताण -
चिंचपोकळी पुलावरून एकापाठोपाठ एक गणेशमूर्ती दर वर्षी जात असतात. केवळ लालबाग-परळमधीलच नाही, तर चेंबूरपासून ज्या मंडळांच्या गणेशमूर्ती सहा फुटांपेक्षा जास्त उंच आहेत, ती शेकडो मंडळे गिरगाव चौपाटीवर जाण्यासाठी चिंचपोकळी पुलाचाच वापर करतात. लालबागच्या राजाची मिरवणूक साधारणत: दुपारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारास चिंचपोकळीच्या पुलावर येते. त्याआधी गणेशगल्ली, चिंचपोकळी, तेजुकाया मॅन्शन, कॉटनचा राजा, नरेपार्क या प्रमुख मंडळांच्या मिरवणुका एका पाठोपाठ जातात. लालबागच्या राजाची मिरवणूक या पुलावरून गेल्यानंतर गर्दी ओसरते.
पोलिस यंत्रणा सज्ज -
अनंत चतुर्दशीला सार्वजनिक गणेश मंडळांच्या सुमारे ५ हजार ६३० गणेशमूर्ती तर ३१ हजार ७२ गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे. एकूण १२९ ठिकाणी विसर्जन व्यवस्था करण्यात आली, असून संवेदनशील ठिकाणी पोलिसांचा विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मिरवणुकांचे नियमन करण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यातील पोलिसांव्यतिरिक्त अतिरिक्त ४० हजार जवान विसर्जन मार्गावर तैनात आहेत.
जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क चौपाटी, मालाड मालवणी टी जंक्शन, पवई गणेश घाट या विसर्जन ठिकाणी वाहतूक पोलिसांचे नियंत्रण कक्ष आहेत. तसेच चौपाटीवर आणि विसर्जन स्थळी जलतरणपटू, तटरक्षक दल आणि नौदलाच्या बोटी सज्ज असून जीवरक्षक जवानही कार्यरत असतील.
५३ रस्ते वाहतुकीसाठी बंद -
विसर्जन मिरवणुकीत होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरातील ५३ रस्ते वाहतुकीसाठी गुरुवारी बंद आहेत. ५६ रस्त्यांवर एकेरी वाहतूक सुरू राहणार आहे. मिरवणुकांना अडथळा होऊ नये, यासाठी ९९ रस्त्यांवर ‘नो पार्किंग’ जाहीर करण्यात आले आहे. १८ रस्त्यांवरून जड वाहनांना प्रवेश बंदी केली आहे, अशी माहिती पोलीस उपआयुक्त (अभियान) प्रणया अशोक यांनी दिली.