मुंबई- घाटकोपर येथे नामांकित दूध कंपन्यांच्या दुधात भेसळ करून विकणाऱ्या टोळीचा गुन्हे प्रकटीकरण कक्ष 7 ने दुधातील भेसळीचा प्रकार उघड केला आहे. भेसळ करणाऱ्या सतीया सीतारामलू पिताला आणि जनाहे अली या दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पुढील कारवाईसाठी दोघांना पंतनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
घाटकोपर परिसरात नामांकित दूध कंपन्यांच्या दुधात भेसळ करणारी एक टोळी कार्यरत असल्याची माहिती युनिट सातच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीची आधारे प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश तावरे यांच्या पथकातील इतर सहकाऱ्यांनी घाटकोपरच्या पंतनगर, गुरुनानक नगरातील एका खोलीत छापा टाकला. यावेळी दोघेजण सत्त्या पित्ताला आणि जनाहे अली हे दुधात गलिच्छ पाणी मिश्रित भेसळ करताना दिसून आले. त्यांच्याकडून पोलिसांनी गोकूळ, अमूल मदर डेअरी, महानंदा आणि गोविंद कंपन्यांचे 237 लिटर दूध, 75 बोगस पिशव्या आणि दूध भेसळ करण्यासाठी लागणारे साहित्य हस्तगत केले.
या दोघांविरुद्ध भादंविसह अन्न सुरक्षा कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यांना पुढील चौकशीसाठी पंतनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सध्या ते दोघेही पोलीस कोठडीत असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.