मुंबई - संपूर्ण देशभरात कोरोना नियंत्रणाच्या उत्कृष्ट व्यवस्थापनासाठी ज्या "मुंबई मॉडेलचा" आज जो गौरव होत आहे, त्या गौरवामध्ये परिचारिकांचा सिंहाचा वाटा असल्याचे प्रतिपादन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. जागतिक परिचारिका दिनी त्या बोलत होत्या. परिचारिकांच्या सेवा कार्याचा महापाैरांनी गाैरव केला आहे.
परिचारिका दिन साजरा
१२ मे हा फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिवस, हा जागतिक परिचारिका दिन म्हणून संपूर्ण जगभरात साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून पालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या परिचारिका वसतिगृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी महापौर बोलत होत्या. याप्रसंगी आरोग्य समिती अध्यक्षा राजुल पटेल, नगरसेवक मंगेश सातमकर, लोकमान्य टिळक रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी, तसेच परिचारिका उपस्थित होत्या.
'आरोग्य सांभाळून काम करा'
'प्रत्यक्ष युद्धातील जखमी सैनिकांच्या सेवेत आपल्या भगिनींसह सहभागी झालेल्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या कर्तुत्वाला नमन करण्याचा आजचा हा दिवस आहे. स्वतःची लहान मुले, कुटुंबियांची माया दूर सारून व आपला युनिफॉर्म आदर्श मानून कोरोनाच्या काळात आमच्या परिचारिका भगिनी आज काम करीत आहेत', असे महापौर कीशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत. तसेच या संकट काळात खचून न जाता, आपले आरोग्य सांभाळून आपले काम सुरू ठेवावे, असा सल्लाही महापौरांनी यावेळी दिला. आपल्या या सातत्यपूर्ण सेवा कार्यामुळेच मुंबई महानगरपालिकेला एक वेगळी सन्मानाची उंची प्राप्त झाल्याचा गाैरव महापाैरांनी केला.
हेही वाचा - अंडे, मटन खा..शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे हिंदू समाजाला आवाहन