मुंबई - वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो-1 सात महिन्यानंतर 19 ऑक्टोबरला सेवेत दाखल झाली. सुरुवातीला दोन दिवस मेट्रो-1 ला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. पण आता मात्र मेट्रो-1 ला मिळणारा प्रतिसाद वाढत आहे. त्यामुळेच मेट्रो 1 सुरू झाल्यापासून आजपर्यंत दहा दिवसांत तब्बल दोन लाख प्रवाशांनी मेट्रो सफर केल्याची माहिती मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल) ने दिली आहे. तर प्रतिसाद वाढता असला तरी आताच फेऱ्या वाढवण्याचा कुठलाही विचार नाही. जेव्हा मुंबई लोकल सेवा 100 टक्के सुरु होईल, सर्वांसाठी लोकल सुरू होईल तेव्हाच मेट्रो 1च्या फेऱ्या वाढवू, असेही एमएमओपीएलने स्पष्ट केले आहे.
पहिल्या दिवशी १३ हजार प्रवाशांचा प्रवास -
कोरोना-लॉकडाऊनमुळे 22 मार्चपासून मेट्रो-1 कारशेडमध्ये होती. पण अनलॉकमध्ये अनेक व्यवहार सुरू झाले पण सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकल सेवा उपलब्ध नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे निदान मेट्रो तरी सुरू करा, अशी लोकांची मागणी होती. ही मागणी राज्य सरकारने मान्य केली. त्यानुसार 19 ऑक्टोबरपासून मेट्रो-1 सेवा सुरू झाली आहे. ही सेवा सुरू झाल्याने वर्सोवा-घाटकोपर असा दररोज प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मेट्रो-1 सुरू झाली त्या पहिल्या दिवशी खूपच कमी प्रतिसाद मिळाला. जेमतेम 13 हजार प्रवाशांनी पहिल्या दिवशी प्रवास केला. मुळात मेट्रोची प्रवासी क्षमता 50 टक्के केल्याने आणि फेऱ्या कमी केल्याने प्रवासी कमी झाले आहेत.
दररोज ३० हजार मुंबईकरांचा मेट्रोने प्रवास -
पण आता मात्र हळूहळू मेट्रो-1 कडे प्रवाशांचा कल वाढत आहे. आता दररोज अंदाजे 30 हजार प्रवासी मेट्रो प्रवास करत आहेत. सुरुवातीला दोन तीन दिवस हा आकडा 15 ते 25 च्या घरात होता. प्रवाशांना कोरोना काळात अत्यंत सुरक्षित, कोरोनाच्या सर्व नियमाचे काटेकोर पालन करत प्रवास करता येत असल्याने आता प्रवासी संख्या वाढत आहे. त्यामुळेच 19 ऑक्टोबरपासून आजपर्यंत 2 लाख प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केल्याचे एमएमओपीएलने स्पष्ट केले आहे. तर आता लोकल सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू झाल्यास आम्ही ही फेऱ्या वाढवू आणि त्यानंतर नक्कीच मेट्रो प्रवाशांचा आकडाही लाखोंने वाढेल, असा विश्वास एमएमओपीएलने व्यक्त केला आहे.