मुंबई - शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज नववा स्मृतिदिन (Balasaheb Thackeray Death Aniversary) आहे. त्या निमित्ताने शिवाजी पार्क (Shivaji Park) येथील त्यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी आज अनेक शिवसैनिक येण्याची शक्यता आहे. मागील २ वर्ष करोनाचे संकट असल्याने शिवसैनिकांनी शिवतीर्थावर येऊ नये अशी विनंती 'मातोश्री'वरून करण्यात आली होती. पण यंदा करोनाचे सावट कमी झाले असून जनजीवन पूर्व पदावर येत असल्याने असंख्य शिवसैनिक आपल्या दिवंगत नेत्याला अभिवादन करण्यासाठी शिवतीर्थावर त्यांच्या समाधीस्थळी येतील. परंतु बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मणक्याचा त्रास झाला आहे व त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असल्याने ते आज शिवतीर्थावर जाऊ शकणार नाहीत, अशी शक्यता आहे.
कार्टूनिस्ट ते वक्ता
एक कार्टूनिस्ट आणि मनात जे असेल ते बेधडक बोलणारा वक्ता म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे बघितले जायचे. इतर पक्षांच्या नेत्यांशी कितीही वाद झाले तरी त्यांच्याबरोबर संवाद ठेवून मैत्री जपून ठेवणे हे त्यांचं विशेष कौशल्य होतं. कितीही मोठे नेते व उच्चपदस्थ राजकारणी असू देत वेळप्रसंगी त्यांच्यावर असूड ओढायला व तद्नंतर मैत्रीपूर्ण संवाद साधायला बाळासाहेब ठाकरे कधी कमी पडले नाहीत.
बाळासाहेब ठाकरे यांचा आज नववा स्मृतिदिन हिंदुत्व आणि बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे हे कट्टर हिंदुत्ववादी होते. हिंदुत्व हा त्यांचा खरा पिंड होता. बाबरी प्रकरण आणि नंतर मुंबईतल्या धार्मिक दंगली या गोष्टी तर अजूनच घातक आहेत. 'हो, जर माझ्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली असेल तर त्याचा मला अभिमान आहे.' हे छातीठोकपणे बोलणारे बाळासाहेब ठाकरे एकमेव नेते होते. 'उठाव लुंगी बजाव पुंगी' म्हणत दक्षिण भारतीय लोकांना त्यांनी केलेला विरोध हा फक्त राजकीय भावनेने प्रेरित नसून आणि त्यात त्यांनी मराठी लोकांनी उद्योगधंद्याला पुढे येण्यासाठी केलेली धडपड होती. हिंदुत्व मराठी माणूस हे त्यांचे पहिले समीकरण होते. "घरात नाही पीठ, मग हवे कशाला विद्यापीठ?" म्हणत नामांतराला विरोध बाळासाहेबांनी केला होता.बाळासाहेबांची लेखणी हेच मोठे शस्त्र १७ नोव्हेंबर २०१२ रोजी बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाले. ते आपल जीवन खुलेपणाने जगले. कुठल्याही व्यसनाला त्यांनी जगापासून लपवून ठेवलं नाही, उलट ते खुलेपणाने केलं आणि त्यात त्यांच्यातला मनस्वी कलाकार त्यांच्या राजकारणी अंगावर भारी पडलेला दिसायचा. 'सामना'मधले त्यांचे लेख हे फक्त शिवसैनिक या एकाच वाचकवर्गाला टार्गेट करून लिहिलेले असायचे आणि त्यांच्या लेखणीतून शिवसैनिकांच्या मनात ते भिडले जायचे. आणि ते सातत्य त्यांनी शेवटपर्यंत ठेवले. लोकशाहीवादी किंवा सेक्युलर दिसण्यासाठी त्यांनी 'सामना'तला मजकूर कधीही मवाळ किंवा सर्वसमावेशक कधी केला नाही. जे मनात तेच थेट लेखणीतून बाहेर यायचे. मुंबई, महाराष्ट्रापासून थेट दिल्लीपर्यंत त्यांचा दरारा होता. ग्रामपंचायती निवडणुकीपासून ते थेट राष्ट्रपती निवडणुकीपर्यंत बाळासाहेब ठाकरे यांना साद घातली जायची.सत्ता हवी पण खुर्ची नको बाळासाहेब ठाकरेंनी कधीही जात-धर्म न पाहता लोकांना निवडणूकीची तिकिटे दिली. परंतु ठाकरे कुटुंबातील व्यक्तीला या निवडणुकांपासून व सतेच्या खुर्चीपासून दूर ठेवले. परंतु आज सत्ता स्थापनेसाठी महाराष्ट्रात झालेल राजकारण हे त्यांना कितपत आवडले असते यावर प्रश्नचिन्ह आहे?