मुंबई - मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. एनआयएच्या टीमने आज गिरगाव येथे असणाऱ्या सोनी इमारतीमध्ये छापा टाकला. या इमारतीमध्ये एक आशिष सोशल क्लब नावाचा जुगाराचा अड्डा होता. या अड्ड्यावर एनआयएने छापा टाकला. या क्लबचा मॅनेजर देवीसेठ जैन यांची चौकशी एनआयएकडून केली जात आहे. सुमारे 12 ते 13 एनआयएचे अधिकारी या ठिकाणी इमारतीमध्ये पोहोचले तेव्हा या क्लबमधून सुमारे १०० लोक बाहेर पडले. देवीसेठ जैन यांनी नरेश गोर याला सिमकार्ड पुरवल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात जैन यांची चौकशी एनआयएकडून केली जात आहे.
हेही वाचा - एनआयएकडून सचिन वाझेंना घेऊन मिठी नदीवर केली तपासणी; सीपीयू आणि डीव्हीआर केला जप्त
मीरा भाईंदरमध्ये दाखल 'एनआयए' टीम
मीरारोडमधील कनकिया परिसरातील सेव्हन इलेव्हन कॉम्प्लेक्समध्ये एनआयएची टीम दाखल झाली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाझे प्रकरणाच्या तपासासाठी ही टीम मीरा भाईंदरमध्ये आली. सेव्हन इलेव्हन कॉम्प्लेक्सच्या सी विंगमधील रूम नंबर ४०१मध्ये एनआयएचे सर्व अधिकारी आले. आज (१ एप्रिल) सकाळीच एनआयएच्या टीमने गिरगाव येथील एका क्लबवर छापा टाकला होता.
स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ
अँटिलिया स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयए करत आहे. यात 2 मर्सिडीज, 1 इनोव्हा, 1 प्राडो, 1 व्होल्वो, 1 आउटलँडर आणि शेवटची स्कॉर्पिओ जी स्फोटकांनी भरलेली होती. मात्र, जप्त केलेल्या 8 गाडयांपैकी 4 गाड्यांचा थेट संबंध पोलीस आयुक्तालयाशी होता, असे एटीएसच्या तपासात उघडकीस आले होते. दरम्यान, आठवी गाडी एनआएने काल (31 मार्च) वसईतून ताब्यात घेतली.
काळ्या रंगाच्या गाडीचा आयुक्तालयाशी संबंध
एनआयए शोधत असलेल्या काळ्या रंगाच्या गाडीचा आयुक्तालयाशी संबंध असल्याचे समोर येत आहे. वाझे आणि विनायक शिंदे याच गाडीत बसल्याचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे. हीच गाडी काही दिवसांपूर्वी सीपी ऑफिसमध्ये उभी होती. ही गाडी गुन्ह्यात वापरल्याचा NIAला संशय आहे.
हेही वाचा - 'एनआयए' पथकाने रेतीबंदरवर सचिन वाझेसह घेतला आढावा
आठही गाड्या जप्त
राष्ट्रीय तपास यंत्रणेने या दरम्यान आतापर्यंत सचिन वाझें हा वापरत असलेल्या 8 गाड्या जप्त केल्या असून 15 मार्च रोजी इनोवा कार मुंबईतून जप्त करण्यात आलेली होती. तर ब्लॅक मर्सिडीज ही 16 मार्च रोजी क्रॉफर्ड मार्केट येथून जप्त करण्यात आली होती. तर 18 मार्च रोजी ब्लु कलरची मर्सडीज ठाण्यातून हस्तगत करण्यात आलेली होती. 22 मार्च रोजी व्हॉल्वओ कंपनीची गाडी एटीएस कडून जप्त करण्यात आलेले आहे. 30 मार्च रोजी नवी मुंबईतील कामोठे येथून आऊट लेंडर ही गाडी जप्त करण्यात आली होती तर 31 मार्च रोजी वसई-विरार परिसरांमधून ऑडी ही गाडी जप्त करण्यात आलेली आहे.
सचिन वाझेने विकत घेतल्या होत्या जिलेटिनच्या कांड्या
राष्ट्रीय तपास यंत्रणेने केलेल्या चौकशी नुसार अँटिलिया या इमारतीच्या बाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील जिलेटिनच्या कांड्या या स्वतः सचिन वाझें याने विकत घेतल्या होत्या. मात्र या जिलेटिनच्या कांड्या त्याने कधी व कुठून विकत घेतल्या होत्या, याचा खुलासा अद्याप करण्यात आलेला नाही. सदरच्या कांड्या नागपूरमधील सोलर इंडस्ट्रीज कंपनीने बनवलेल्या असल्याचे याआधी समोर आले होते. नागपूरमधील जिलेटिनच्या कांड्या बनविणाऱ्या कंपनीच्या काही अधिकाऱ्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून बोलवले जाण्याची शक्यता आहे. त्यांची जबानी घेतली जाणार आहे. याआधी नागपूर पोलिसांनी या कंपनीच्या संचालकांचा जबाब नोंदवून घेतलेला आहे.
डायरीमधून महत्त्वाची माहिती समोर
या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या 3 आरोपींपैकी एक विनायक शिंदे याच्या कळवा येथील घरामधून राष्ट्रीय तपास यंत्रणेला मिळालेल्या डायरीमधून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विनायक शिंदेच्या घरात डायरी मिळाली असून, त्यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.